इलेक्शन अपडेट – शिवडीत आज शिवसेनेचा निर्धार मेळावा

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवडी विधानसभेतील शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादीतील (शरदचंद्र पवार) पुरुष आणि महिला कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा शुक्रवारी सायंकाळी 6.30 वाजता समाजमंदिर हॉल, अभ्युदय नगर, काळाचौकी येथे होणार असून या मेळाव्यास शिवडी विधानसभेतील सर्व उमेदवार उपस्थित राहणार आहेत.

शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, मनसे नेते बाळा नांदगावकर, शिवसेना आमदार अजय चौधरी, शिवसेना सचिव सुधीर साळवी, राष्ट्रवादीचे विजय झांजुरे, रणधीर परळकर, मनसेचे नंदकुमार चिली, संतोष नलावडे, शिवसेनेचे उपविभागप्रमुख गजानन चव्हाण, पराग चव्हाण आदी मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत.

निवडणूक प्रक्रियेमध्ये बाधा, कनिष्ठ लेखा परीक्षक निलंबित

मुंबईमहानगरपालिकेच्यानिवडणूक कामकाजात गंभीर स्वरूपाचे गैरवर्तन आणि निवडणूक प्रक्रियेला बाधा पोहोचवल्याप्रकरणी कनिष्ठ लेखा परीक्षकाचे निलंबन करण्यात आले आहे. अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी याबाबत कारवाईचे निर्देश दिले. दीपक जोहरे असे निलंबित करण्यात आलेल्या कनिष्ठ लेखा परीक्षकाचे नाव आहे. ते महानगरपालिकेच्या वित्त विभागात कनिष्ठ लेखा परीक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांची नियुक्ती मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मध्यवर्ती निवडणूक कार्यालयात करण्यात आली होती. निवडणूक कामकाज करताना जोहरे यांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचे गैरवर्तन केल्याची, निवडणूक प्रक्रियेत बाधा पोहोचविल्याची तक्रार आणि याबाबतचा सबळ पुरावा महानगरपालिका प्रशासनाला प्राप्त झाला. प्रथमदर्शनी चौकशीमध्ये आढळून आलेल्या गंभीर स्वरूपाच्या गैरवर्तणुकीच्या अनुषंगाने जोहरे यांचे तत्काळ प्रभावाने निलंबन करण्यात आले.