
पोलीस उपनिरीक्षक पदाच्या भरतीची जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्याने अनेक विद्यार्थ्यांची संधी हुकणार आहे. त्यामुळे वयोमर्यादेच्या नियमांत शिथिलता आणावी अशी मागणी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱया विद्यार्थ्यांनी पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारल्याने विद्यार्थी नाराज झाले आहेत. आम्ही आत्महत्या केल्यावरच मुख्यमंत्र्यांना जाग येणार का? असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.
विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. परंतु, अद्याप निर्णय झालेला नसल्याने विद्यार्थी आक्रमक झाले होते.
एमपीएससीकडून पीएसआयची जाहिरात शासन धोरणामुळे सात महिने उशिरा आली. वयोमर्यादेमुळे काही विद्यार्थी अपात्र ठरले आहेत. वयोमर्यादा गणना 1 नोव्हेंबर 2025 पर्यंत असून, त्यांनी 1 जानेवारी 2025 पासून धरावी, कित्येक विद्यार्थी अपात्र ठरत आहेत. आम्ही सात महिने पाठपुरावा करत आहोत. 4 जानेवारीला परीक्षा आहे. त्यामुळे 4 लाख विद्यार्थी संभ्रमात असल्याचे एका विद्यार्थ्याने सांगितले.
…अन्यथा पोरं मरतील
सरकारने परिस्थितीचं गांभीर्य ओळखावे, अन्यथा पोरं मरतील. आम्ही पोटतिडकीने सांगत आहोत. सरकारने शासन निर्णय जाहीर करून वयोमर्यादेबाबत विद्यार्थ्यांना माहिती द्यावी. रविवारी (दि.4) परीक्षा आहे. – एक विद्यार्थिनी

































































