
दुधात भेसळ करून नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्याला वर्सोवा पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन (एफडीफ) ने चांगलाच दणका दिला. दूध भेसळप्रकरणी पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
काही दिवसांपूर्वी अंधेरी येथे दूध भेसळीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दूध भेसळीच्या प्रकराची पोलिसांनी गंभीर दखल घेतली. अंधेरी चार बंगला येथील नवजीत रहिवासी संघ येथे एक जण दूध भेसळ करत असल्याची माहिती वर्सोवा पोलिसांना मिळाली. त्या माहितीनंतर पोलिसांनी एफडीएच्या मदतीने तेथे मंगळवारी सकाळीच छापा टाकला.
पोलिसांनी सुरुवातीला रवी कालिमाराच्या घरात छापा टाकला. त्याच्या घरात छापा टाकून भेसळ केलेले दूध जप्त केले. तसेच पोलिसांनी तेथून मेणबत्ती, स्टोव्हच्या पिनाचा चिमटा, लाईटर, दुधाच्या पिशव्या, ब्लेड, नरसाळे, गाळणी जप्त आदी वस्तू ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी व्यकंना बैरूए, जवाजी श्रीनिवास, रामलिंग्या गज्जी, नरसिंमहा कोलापल्ली, रजनी बतूला, मंजुला जवाजीच्या घरात छापा टाकला. सात घरात छापा टाकून पोलिसांनी 958 लिटर भेसळयुक्त दूध जप्त केले. ही टोळी प्रसिद्ध दूध कंपन्यांच्या दुधाच्या पिशव्यामधून मूळ दूध बाहेर काढायचे. त्यात ते दूषित पाणी टाकून भेसळ करत असल्याचे तपासात समोर आले आहे.

































































