
एसटीच्या चालक-वाहकांच्या ओव्हरटाईम भत्त्यात बेकायदा कपात केली जात आहे. आगार पातळीवरील ढिसाळ नियोजनाचा बचाव तसेच महामंडळाचे उत्पन्न वाढवण्यासाठी आगार व्यवस्थापक आणि वाहतूक पर्यवेक्षक हा प्रकार करीत आहे. या माध्यमातून कामगारांचे शोषण सुरू असून ते थांबवण्यासाठी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. संघटनेने आगार व्यवस्थापकांच्या मनमानीविरोधात एसटी महामंडळाच्या उपाध्यक्षांना पत्र लिहिले आहे.
एसटी महामंडळाने पंचसूत्री कार्यक्रमांतर्गत उत्पन्नात वाढ करणे आणि खर्चात काटकसर करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. परंतु खर्चात काटकसर करतांना आगार प्रशासनाकडून तक्ता क्रमांक-4 नुसार निर्धारित केलेली धाव वेळ तसेच प्रत्यक्ष लॉगशिटवर लागलेली धाव वेळ यासंबंधी ‘टी 2 ए’वर खोटय़ा नोंदी करून मध्यवर्ती कार्यालयाच्या सूचनांचे पालन न करता परस्पर चालक-वाहकांच्या ओव्हरटाईम भत्यात कपात करण्यात येत आहे. कर्मचाऱयांचा अतिरिक्त कामाचा मोबदला देण्यात व्यत्यय आणणे, खोटय़ा नोंदी घेणे, खोटे रेकॉर्ड तयार करणे हा फौजदारी गुन्हा आहे. आगार व्यवस्थापक आणि वाहतूक पर्यवेक्षकांकडून कर्मचाऱयांच्या ओव्हरटाईम भत्त्याला ‘कात्री’ लावून करून महामंडळाचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न सर्रासपणे केला जात आहे. या बेकायदेशीर कार्यपद्धतीमुळे कर्मचाऱयांच्या घामाचे नव्हे तर रक्ताचे शोषण करण्याचा प्रकार सुरू आहे. ही गुन्हेगारी प्रवृत्ती तातडीने थांबवावी, अशी मागणी करीत एसटी कामगार सेनेने महामंडळाच्या उपाध्यक्ष-व्यवस्थापकीय संचालकांना पत्र दिले आहे.
कामगारांच्या अतिकालीन भत्त्याला कात्री लावून महामंडळाचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करणे हा कामगारांच्या रक्ताचे शोषण करण्याचा प्रकार आहे. महामंडळाने आगार प्रशासनाच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कार्यपद्धतीला तातडीने आळा घातला पाहिजे, कामगारांच्या श्रमाचा योग्य मोबदला दिला पाहिजे.
– हिरेन रेडकर, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कामगार सेना




























































