ऐन निवडणुकीत लाडक्या बहिणींच्या पदरी निराशा, रखडलेल्या हप्त्यांपैकी फक्त नोव्हेंबरचा हप्ता जमा

ऐन महानगरपालिका निवडणुकीत महायुती सरकारच्या नियोजनाअभावी लाडक्या बहिणींच्या पदरी निराशाच पडली आहे. दोन महिन्यांच्या रखडलेल्या हप्त्यांपैकी फक्त एकच हप्ता 2025 च्या वर्षाअखेरीस लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला. नोव्हेंबर-डिसेंबरसह जानेवारीचा हप्ता मिळून 4500 रुपये जमा होतील अशी अपेक्षा होती. पण केवळ नोव्हेंबरचेच 1500 रुपये जमा झाल्याने महिलांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

लाडक्या बहिणींमधील बोगस लाभार्थी शोधून काढण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया सुरू झाल्यापासून 1500 रुपये येणे बंद झाले आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ताच पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यांमध्ये जमा झाला नव्हता. त्यातील नोव्हेंबर महिन्याचा हप्ता बुधवारी जमा करण्यात आला.