
ठाणे महानगरपालिकेची निवडणूक यंत्रणा कोलमडली असून राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली येथील अधिकारी व कर्मचारी काम करीत असल्याचे दिसून आले आहे. शिंदे गटाच्या उमेदवारांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी यंत्रणा कामाला लागल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. त्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दोन व मनसेच्या एका अधिकृत उमेदवाराचा अर्ज थातूरमातूर कारणे देत ऐनवेळी बाद ठरवण्यात आला. त्यामुळे संतापाचा भडका उडाला असून शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यालयावर धडक दिली. तसेच प्रश्नांची सरबत्ती करीत जाब विचारला. रात्री उशिरापर्यंत कार्यालयात तुफान गोंधळ सुरू होता. शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.
प्रभाग क्रमांक १६ मधून शिवसेनेचे उमेदवार अरविंद चौहान, प्रभाग क्रमांक ५ मधून दीप्ती जाबर यांचा अर्ज बाद केला. तसेच मनसेच्या प्रभाग क्रमांक १८ मधील महिला उमेदवार प्राची घाडगे यांनी भरलेल्या अर्जाच्या रकान्यात ‘निरंक’ लिहिले नसल्याचा आक्षेप नोंदवत त्यांचाही अर्ज बाद ठरवला. विशेष म्हणजे दीप्ती जाबर यांचा उमेदवारी अर्ज पहाटे ५ वाजता अवैध ठरवला गेला. ही बाब समजताच शिवसेना नेते व माजी खासदार राजन विचारे, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे आणि मनसेचे नेते अविनाश जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, मनसेचे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेऊन जाब विचारला.
मग त्यांचे अर्ज वैध कसे?
शिंदे गटाचे उमेदवार एकता भोईर यांच्या सत्यप्रतिज्ञापत्रात शेवटचे पान आणि स्वाक्षरी नसतानाही त्यांचा अर्ज वैध ठरविण्यात आला. तसेच शिल्पा वाघ यांच्या अर्जातही रकाना रिकामा असूनसुद्धा तो अर्ज वैध ठरवण्यात आला. विरोधकांचे अर्ज बाद, मग सत्ताधाऱ्यांचे अर्ज कसे वैध झाले, असा सवाल शिवसेना, मनसे व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना केला.
सत्तेचा गैरवापर चालू आहे. निवडणूक अधिकाऱ्यांकडे उमेदवारांची कागदपत्रे जमा झाली असताना उशीर झाला असे सांगण्यात आले. एकनाथ शिंदे समर्थकांचे अर्ज वैध ठरवण्यात आले. मात्र शिवसेना, मनसेच्या उमेदवारांचे अर्ज जाणूनबुजून बाद करण्यात आले.
राजन विचारे (शिवसेना नेते)
निवडणूक निर्णय अधिकारी वृषाली पाटील यांनी अधिकाराचा गैरवापर करून सत्ताधारी पक्षातील उमेदवारांचे अर्ज गंभीर त्रुटी असूनदेखील बाद केले नाहीत. मात्र शिवसेना, मनसेसह विरोधी पक्षातील उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवले. सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सत्ताधाऱ्यांनी षडयंत्र रचले असून अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी.
अविनाश जाधव (मनसे नेते)
गुन्हेगार, बेकायदा बांधकाम केलेल्यांचे अर्ज वैध ठरवण्यात आले. निवडणूक यंत्रणा सत्ताधाऱ्यांची बटीक झाली आहे. सत्ताधारी उमेदवारांच्या अर्जावर हरकत घेऊनही त्यांचे अर्ज कायम करण्यात आले. निवडणूक अधिकाऱ्यांचे फोन चेक करा, प्रत्येकाला वरिष्ठ मंत्र्यांनी फोन करून यंत्रणेवर दबाव टाकला आहे.
जितेंद्र आव्हाड (आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार)




























































