
मंदा म्हात्रे यांनी शिफारस केलेल्या १३ उमेदवारांची नावे भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या यादीत नव्हती. ही यादी आपण नाही तर पक्षाचे वरिष्ठ आणि नवी मुंबईतील निवडणूक प्रमुख गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली आहे. त्याच यादीतील उमेदवारांना आपण एबी फॉर्म दिले. यादीत नाव नसल्यामुळे अन्य १३ उमेदवारांच्या एबी फॉर्मवर स्वाक्षरी केलेली नव्हती, अशी सारवासारव भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांनी करून म्हात्रे समर्थकांची तिकिटे नाईकांनी कापल्याची अप्रत्यक्ष कबुली दिली आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आपल्या १३ समर्थकांना उमेदवारी देण्याची मागणी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली होती. मात्र या निवडणुकीची जबाबदारी प्रदेशपातळीवरून गणेश नाईक यांच्या खांद्यावर देण्यात आली. माजी खासदार संजीव नाईक यांना निवडणूक प्रभारी बनवण्यात आले. उमेदवारी वाटप करताना मंदा म्हात्रे यांच्या १३ समर्थकांना स्वाक्षरी नसलेले एबी फॉर्म देण्याचा कारनामा डॉ. राजेश पाटील यांनी केला आणि त्यानंतर ते नेहमीच्या स्टाईल मध्ये फोन स्विच ऑफ करून गायब झाले. उमेदवारी भरण्याच्या शेवटच्या दिवशी घडलेल्या या प्रकारामुळे म्हात्रे समर्थकांच्या संतापाचा भडका उडाला.
माझा काहीच दोष नाही
सकाळपासून गायब असलेले जिल्हाध्यक्ष संध्याकाळी आमदार म्हात्रे यांच्या घरी प्रकट झाले. त्यावेळी कार्यकर्त्यांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले. यावेळी शंकांचे निरसन करताना त्यांच्या नाकीनऊ आले. माझा उमेदवारी वाटपाशी काहीच संबंध नाही. उमेदवारांची यादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, वनमंत्री गणेश नाईक, संजीव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली. त्या यादीत या १३ उमेदवारांच्या नावाचा कुठेही उल्लेख नव्हता. त्यामुळे त्यांना स्वाक्षरी असलेले एबी फॉर्म दिले नव्हते, असे पाटील यांनी स्पष्ट करून हे सर्व नाईक यांच्या आशीर्वादानेच घडले यावर शिक्कामोर्तब केले.




























































