
पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक दोन फुलेनगर नागपूर चाळमधून भाजपच्या पूजा धनंजय जाधव-मोरे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, भाजप कार्यकर्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थकांनी पूजा मोरे यांच्या मागील काही वर्षांतल्या विधानांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करत पक्षाच्या उमेदवारीच्या निर्णयावर प्रचंड टीका केली होती. मोरे यांना होणारा विरोध लक्षात घेता, भाजपने त्यांना अर्ज माघारी घ्यायला सांगितले. पक्षाच्या आदेशानंतर पूजा मोरे यांना आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला. अर्ज माघारी घेतल्यानंतर पूजा मोरे यांना भावना अनावर झाल्या. त्या ओक्साबोक्शी रडल्या. गरिबीतून संघर्ष करून मी इथपर्यंत पोहोचले; परंतु माझ्या नशिबात त्याग होता. हिंदुत्वाची विचारधारा मी समजून घेतली आहे. मला भाजपने आणि संघ कार्यकर्त्यांनी स्वीकारावे, असेही पूजा मोरे यांनी सांगितले.
पुण्यातील प्रभाग क्रमांक दोनमधून पूजा मोरे-जाधव यांनी भाजपकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांना प्रभाग क्रमांक एकमधून उमेदवारी हवी होती. मात्र, पक्षाने त्यांना प्रभाग क्रमांक दोनमधून एबी फॉर्म दिला. त्यांना उमेदवारी दिल्यानंतर समाजमाध्यमांवर भाजप कार्यकर्ते आणि संघ समर्थकांनी पक्षावर तीव्र नाराजी व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणार्या व्यक्तीला उमेदवारी कशी मिळू शकते? असा सवाल उपस्थित केला. आम्ही सोशल मीडियाचे बळी ठरलो आहोत. माझ्या पत्नीने जे विधान केले नाही, ते विधान तिच्या तोंडी घातले गेले. मराठा आरक्षण आंदोलनावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीबद्दल केलेले विधान पूजा मोरे यांनी केले नव्हते. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर केलेल्या विधानाबाबतही माझ्या पत्नीने तेव्हाच स्पष्टीकरण दिले असल्याचे धनंजय जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सोशल मीडियावर जुने व्हिडीओ पुन्हा शेअर
मराठा आरक्षण आंदोलनात पूजा मोरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. ‘देवेंद्र फडणवीस आम्ही आरक्षण मागतो, तुमची पत्नी मागत नाही’, अशा प्रकारचे विधान त्यांनी केले होते. तर पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मोरे यांनी ‘दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या नाहीत’, असे विधान केले होते. या दोन्ही विधानांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता तेच व्हिडीओ कार्यकर्त्यांनी पुन्हा अपलोड करत मोरेंंच्या उमेदवारीला तीव्र विरोध दर्शवला.




























































