अजित पवारांसोबत बजरंग सोनवणेंची हवाई सफर; एकत्र येण्याचे संकेत की, मुंडेंना इशारा

ajit pawar and bajrang sonwane travel together political signals in maharashtra

विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी बीडमध्ये दाखल झालेले अजित पवार परतीच्या प्रवासाला हेलिकॉप्टरने जात असताना बीड ते संभाजीनगर आणि संभाजीनगर ते पुणे प्रवासासाठी त्यांनी बीडचे शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणेंना सोबत घेतले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बजरंग सोनवणे यांच्या एकत्र प्रवासाची चर्चा दिवसभर सुरू होती. यातून दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याचे संकेत दिले जात आहेत की मुंडे बंधू-भगिनीला इशारा आहे, हे आगामी काळात कळेल.

उपमुख्यमंत्री अजित पवार नविन वर्षाच्या पहिल्याच दिवशी बीडमध्ये विकास कामांच्या उद्घाटनासाठी दाखल झाले. चार तासाच्या या वेळेत त्यांनी अनेक विकास कामांची उद्घाटने आणि भूमीपूजन केले. आयोजित कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवारांसह खा. बजरंग सोनवणे, आ. प्रकाश सोळंके, आ. संदीप क्षीरसागर, आ. सुरेश धस, आ. विजयसिंह पंडित उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार संभाजीनगरकडे जाताना त्यांनी प्रवासात आपल्या सोबत खा. बजरंग सोनवणे यांना घेतले. एकाच हेलिकॉप्टरमध्ये हे दोघे प्रवासासाठी गेल्याने बीडमध्ये राजकीय चर्चांना उधान आले. बजरंग सोनवणेंना सोबत घेवून जाणे हे दोन राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाचे संकेत आहेत की, अजून काही याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. गेल्या आठवडाभरापासून आ.धनंजय मुंडे हे भाजपामध्ये जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा बीड जिल्ह्यामध्ये सध्या सुरू आहेत. मग धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या एकाच पक्षामध्ये एकत्र येत असतील तर आम्ही आणि बजरंग सोनवणेही एकत्र येवू शकतो. मुंडेंना शह देण्यासाठी सोनवणे आम्हाला चालतात असा जणू इशाराच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला तर नाही ना असा तर्क लावला जात आहे.