मुख्यमंत्र्यांकडून काम करून घेता अन्… नार्वेकरांनी काय-काय धमक्या दिल्या, हरिभाऊ राठोड यांनी माध्यमांना सगळं सांगितलं

राज्यात महानगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू असताना दक्षिण मुंबईतील कुलाबा भागात मोठा वाद निर्माण झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी उमेदवारांना धमकावल्याचा आरोप होत आहे. कुलाबा येथील 3 वॉर्डांमध्ये आपल्या कुटुंबातील 3 उमेदवारांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी राहुल नार्वेकर यांनी दबाव आणल्याचा आरोप ओबीसी नेते व माजी खासदार हरीभाऊ राठोड यांनी केला आहे. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून नार्वेकर यांनी काय-काय धमक्या दिल्या याची माहिती आता हरिभाऊ राठोड यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना हरिभाऊ राठोड म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर पाच वाजेपर्यंत तिथे होते आणि पाच वाजल्यानंतरही गाडीत बसले होते. तिथे त्यांनी मला धमकी दिली. नार्वेकरांनी माझी सुरक्षा काढण्याची आणि सर्व सोयी-सुविधा काढून घेण्याची धमकी दिली. एवढेच नाही तर माझ्यासमोर डीसीपींना फोनही लावला.

सुरक्षा देण्यासाठी तुम्ही काय निकष आहेत असे विचारले आणि माझी सुरक्षा रद्द करण्यासाठी लागलीच पत्रक काढण्याचे आदेशही विधानसभा अध्यक्ष नात्याने दिले. मला जीवे मारण्याची धमकी आहे, त्यासाठी ही सुरक्षा असल्याचे सांगितल्यानंतरही त्यांनी धमकी दिली, असे हरिभाऊ राठोड म्हणाले.

तुम्ही विधानसभा अध्यक्ष आहात. तुम्हाला शोभत नाही. तुम्ही संविधानिक पदावर आहात. तुम्ही कार्यकर्त्यासारखे आत-बाहेर फिरताय, हे तुम्हाला शोभत नाही बोलल्यावर त्यांनी माझ्या सर्व सोयी-सुविधान काढून घेण्याची धमकी दिली, असा आरोप हरिभाऊ राठोड यांनी केला.

तुमचा प्रयत्न आहे की तुमचा भाऊ, बहीण आण वहिनीला बिनविरोध निवडून आणायचे आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी धमक्या दिल्या जात आहेत. तुम्ही मुख्यमंत्र्यांकडून काम करून घेता आणि इथे आमच्याविरुद्ध अर्ज भरता असे म्हणत त्यांनी आम्हाला तिथेच थोपवण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर काऊंटरलाही घाई करू नका असे म्हटले. ते दोन तास इकडे होते, असेही हरिभाऊ राठोड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

दरम्यान, विधानसभा अध्यक्षांच्या दबावामुळे विरोधी उमेदवारांचे अर्ज स्वीकारले नाहीत. या विरोधात हरीभाऊ राठोड यांनी पालिका आयुक्त व राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. राठोड यांच्या तक्रारीची दखल घेऊन निवडणूक आयोगाने पालिका आयुक्तांना यासंदर्भातील अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले आहेत.