
मुंबईच्या सांताक्रूझ पूर्व भागातील कलिना परिसरात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. येथे एका 25 वर्षीय तरुणीने लग्नाला वारंवार नकार देणाऱ्या आपल्या 42 वर्षीय प्रियकरावर जीवघेणा हल्ला करत त्याचे गुप्तांग कापले. नवीन वर्षाच्या पार्टीच्या बहाण्याने तरुणीने त्याला आपल्या घरी बोलावले होते आणि रागाच्या भरात हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वकोला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्ती आणि आरोपी तरुणी गेल्या सात वर्षांपासून रिलेशनमध्ये होते. या सात वर्षांच्या काळात तरुणीने अनेकदा लग्नासाठी विचारणा केली होती. मात्र प्रत्येक वेळी त्या व्यक्तीने लग्नाला नकार दिला. यामुळे तरुणीच्या मनात प्रचंड राग होता. गुरुवारी पहाटेच्या सुमारास त्यांच्यात पुन्हा लग्नाच्या मुद्द्यावरून जोरदार वाद झाला. आणि या वादाला हिंसक वळण लागले.
या वादादरम्यान संतापलेल्या तरुणीने धारदार शस्त्राने प्रियकरावर हल्ला केला आणि त्याचे गुप्तांग कापले. गंभीर जखमी अवस्थेतही पीडित व्यक्तीने कशीबशी तिथून सुटका करून घेतली आणि आपल्या भावाला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या या पीडित व्यक्तीवर उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी वकोला पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांनुसार गंभीर दुखापत करणे आणि गुन्हेगारी धमकी दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी तरुणी फरार झाली असून, तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.





























































