आर्थिक राजधानी मुंबई, सुसाट मुंबई! हे स्वप्न, हा शब्द ठाकरेंचा; आदित्य आणि अमित ठाकरे यांचे मुंबईतील उमेदवारांसमोर मुद्देसूद सादरीकरण

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी संयुक्तरित्या शिवसेना भवनात मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या मुंबईतील उमेदवारांशी संवाद साधला. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी उमेदवारांसमोर मुद्देसूद सादरीकरण करत उमेदवारांना प्रचारासाठी एक दिशा दिली. यामुळे उमेदवारांमध्ये मोठा उत्साह आणि जोश निर्माण झाला. ही आमच्या मनातली इच्छा आहे, आमचं स्वप्न आहे आणि हा शब्द ठाकरेंचा आहे तो आपल्याला लोकांसमोर न्यायचा आहे, असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

आता सगळे उमेदवार आहात १६ तारखेला परत जिंकून नगरसेवक बनून यायचं आहे. एक छान समीकरण आपलं जुळलेलं आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे आणि शरद पवारसाहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष आपण एकत्र आलेलो आहोत. आपण काय ताकदीने लढा देतोय हे सर्वांना माहिती आहे. आपल्या समोरून साम, दाम, दंड, भेद हे सगळं काही वापरलं जात आहे. तन, मन, धन या लढाईमध्ये तन आणि मन आपल्याकडे आहे. धन हे सगळं त्यांच्याकडे आहे. धन त्यांच्याकडे असल्याने अर्थात त्याचा वापर तर होणारच आहे. त्याचे कसं वाटप सुरू आहे, कुठे ताटं तर कुठे वाट्या आणि पैसे देताहेत. हे सगळं सुरू आहे. निवडणूक आयोग किती कोणाच्या बाजूने राहणार ही एक वेगळी कथा आहेच, असा हल्ला यावेळी आदित्य ठाकरे यांनी भाजप, मिंधेंवर चढवला.

अनेक ठिकाणी आपल्या उमेदवारांना फोन येताहेत, धमक्या येताहेत, उमेदवारी मागे घ्या नाहीतर… असं करू, तसं करू आणि हे फक्त मुंबईत नाही तर अनेक शहरांत होत आहे. अंबादास दानवे यांनी देखील काही गोष्टी ट्विट करून सांगितल्या आहेत. पण हे सगळं होत असताना जसं उद्धवसाहेब आणि राजसाहेब यांची चर्चा सुरू असते. ते रोज बोलतच आहेत की, आपण एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी आलो आहोत. आणि निवडणूक आपण लढत आहोत ती जिंकण्यासाठी लढत आहोत. मुंबई वाचवण्यासाठी लढत आहोत, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. जे मोठे विषय आहेत, हिंदुत्व असेल, मराठी असेल, मुंबईचं मुंबईपण असेल, मुंबईला अदानीकडून वाचवण्याचं असेल हे सगळं ते दोघे हाताळणार आहेतच. हे सगळं होत असताना तुमच्या सगळ्यांच्या प्रचारफेऱ्या सुरू झालेल्या आहेत. तुमच्या कार्यालयांचे उद्घाटनं सुरू झालेली आहेत. आणि तुम्ही जेव्हा घरोघरी जाल तेव्हा तुम्हाला प्रश्न विचारले जातील, तुम्ही कशासाठी उभे राहताय? अर्थात मुंबईचं मुंबईपण आहे, मुंबई मराठी माणसाच्या हातात राहिली पाहिजे, मुंबईकर हा कोणासमोर झुकला नाही पाहिजे, दिल्लीसमोर तर झुकलाच नाही पाहिजे, हे लढत आहोतच, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

आम्ही दोघांनी १५-१६ गोष्टी काढलेल्या आहेत, ज्या तुम्ही आतापासून सुरू करू शकता की, ही आमच्या मनातली इच्छा आहे, आमचं स्वप्न आहे आणि हा शब्द ठाकरेंचा आहे तो आपल्याला लोकांसमोर न्यायचा आहे, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. हे एक वर्कशॉप समजा, हा वचननामा नाही. तर हे तुम्हाला लोकांमध्ये न्यायचं आणि जिंकून आल्यानंतर आपले महापौर बसल्यानंतर आपल्याला या गोष्टी करून दाखवायच्या आहेत, असे सांगत आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी उमेदवारांवरसमोर सादरीकरण केले.

मुंबईची जमीन मुंबईकरांच्या घरांसाठीच, खिशाला परवडणारा बेस्ट प्रवास, सार्वजनिक आरोग्य, महापालिकेच्या शाळांमध्ये ज्युनिअर कॉलेज, मुंबईकरांचा स्वाभिमान, प्रत्येकाला सुरक्षित पार्किंग, वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्वयं-रोजगार अर्थसाह्य योजना, ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ, पादचारी रस्ता, फूटपाथ आणि मोकळ्या जागा, मुंबईकरांना मोकळा श्वास, आर्थिक राजधानी मुंबई सुसाट मुंबई, युवा मुंबई- युवा मुंबईकर, चॅटबॉटद्वारे प्रशासकीय सेवा, मुंबई महापालितर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने देशातील सर्वात मोठं ग्रंथालय उभारलं जाईल, अशा विविध मुद्यांवर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी सादरीकरण केले. उमेदवारांना मार्गदर्शन केले.

आदित्य आणि अमित ठाकरे यांनी मांडलेले १५ मुद्दे पुढील प्रमाणे…

> मुंबईची जमीन मुंबईकरांच्या घरांसाठीच

– महापालिकेच्या मालकीच्या जमिनी खासगी विकासकांच्या घशात न घालता तिथे मुंबईकरांची सेवा करणा-या शासकीय, महापालिका, बेस्ट आणि पोलीस कर्मचा-यांना तसंच गिरणी कामगारांना हक्काची घरं देणार.
– मुंबई महापालिकेचं स्वतःचं गृहनिर्माण प्राधिकरण असेल.
– पुढील ५ वर्षात १ लाख मुंबईकरांना परवडणारी हक्काची घरं दिली जातील.

> परिवहन- खिशाला परवडणारा बेस्ट प्रवास

– तिकीट दरवाढ कमी करून रू. ५-१०-१५-२० फ्लॅट रेट ठेवणार
– बेस्टच्या ताफ्यात १०,००० ईलेक्ट्रिक बसेस
– ९०० डबल-डेकर ईलेक्ट्रिक बसेस
– जुने मार्ग पुन्हा सुरू करणार
– महिला आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष बेस्ट बसमध्ये मोफत प्रवास

> सार्वजनिक आरोग्य मुंबईकरांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य

– मुंबईत पाच नवी वैद्यकीय महाविद्यालये. (Shatabdi Govandi, Shatabdi Kandivali, MT Agarwal Mulund, Bhagwati Borivali, Rajawadi Ghatkopar)
– पालिका रूग्णालये आणि दवाखान्यांमध्ये रूग्णांना जेनेरिक औषधे मोफत
– ज्येष्ठ नागरिकांसाठी २४x७ हेल्थ केअर कंट्रोल रूम आणि हेल्थ-टू-होम सेवा
– महापालिकेची स्वतःची रुग्णवाहिका सेवा सुरू करणार
– मुंबई महापालिकेचं स्वतःचं कॅन्सर रुग्णालय असेल.

> शिक्षण- पालिकेच्या शाळांमध्ये ज्युनिअर कॉलेज

– पालिका शाळांच्या जमिनी कदापी बिल्डरांच्या घशात जाऊ देणार नाही.
– दहावीनंतरची गळती रोखण्यासाठी शाळांमध्ये बारावीपर्यंतचे ज्युनिअर कॉलेज.
– सर्व माध्यमांच्या शाळांत ‘बोलतो मराठी’ उपक्रम राबवणार

> आत्मसन्मान- मुंबईकरांचा स्वाभिमान

– घरकाम करणा-या महिलांची नोंदणी करणार आणि नोंदणीकृत महिलांना दर महिन्याला रू.१,५०० स्वाभिमान निधी.
– कोळी मच्छीमार महिला विक्रेत्यांची नोंदणी, अर्थसाह्य आणि नवीन परवान्यांची तरतूद ज्यात समुदायांतर्गत परवान्यांच्या हस्तांतरणाची सोय केले जाईल.
– कष्टकरी मुंबईकरांसाठी फक्त १० रुपयांत नाश्ता आणि दुपारचं जेवण देणारी मासाहेब किचन्स.
– मुंबईतील आमच्या भगिनींच्या लहान मुलांसाठी उत्कृष्ट दर्जाची पाळणाघरं उभी करू.
– मुंबईतील प्रमुख रस्त्यांवर दर २ किलोमीटरला एक अशी महिलांसाठी उत्तम स्वच्छता असलेली शौचालयं बांधली जातील.

> प्रत्येकाला सुरक्षित पार्किंग

– महापालिकेच्या वाहनतळांमध्ये पार्किंग मोफत.
– नव्या पुनर्विकसित इमारतींमध्ये प्रत्येक फ्लॅटला पार्किंग सुविधा देणे बंधनकारक. (1:1)

> स्वयंरोजगार- वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्वयं-रोजगार अर्थसाह्य योजना

– एक लाख तरुण-तरूणींना प्रत्येकी २५ हजार ते १ लाख रुपयांचा स्वयंरोजगार सहाय्यता निधी तसंच २५ हजार गिग वर्कर्सना आणि डबेवाल्यांना ई-बाईकसाठी बिनव्याजी कर्ज.

> करप्रणाली – मुंबईकरांचे ओझे हलके

– ७०० चौ. फुटांपर्यंत घरे असलेल्यांचा मालमत्ता कर माफ. सोसायट्यांना ईको-फ्रेंड्ली सुविधांसाठी एक लाखाची सबसिडी. कचरा संकलनासाठी प्रस्तावित अदानी कर रद्द करणार.

> पादचारी रस्ता- फूटपाथ आणि मोकळ्या जागा

– रस्त्यांइतकेच फूटपाथही महत्वाचे आहेत, “Pedestrian First” धोरणाची अंमल बजावणी करून फुटपाथ पेव्हर ब्लॉक-फ्री आणि दिव्यांग-स्नेही करणार.
– शब्दांचा खेळ करून मुंबईतील मोकळ्या जागा आणि विशेषतः महालक्ष्मी रेसकोर्स, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आरे जंगल आणि अन्य मोकळ्या जमिनी कोणत्याही परिस्थितीत बिल्डरांना आंदण
दिल्या जाणार नाहीत.

> मुंबईकरांना मोकळा श्वास

– गेल्या तीन वर्षांत वाढलेले प्रदूषण तातडीने कमी करण्यासाठी मुंबई पर्यावरण कृती आराखड्याची कठोर अंमलबजावणी करणार.
– हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई बांधकाम पर्यावरणीय व्यवस्थापन (एमसीईपी) योजना अंमलात आणणार.
– अनियंत्रित विकासामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आरे जंगल तसंच मुंबईतील कांदळवनं आणि वृक्षसंपदा उद्ध्वस्त होऊ देणार नाही.

> आर्थिक राजधानी मुंबई, सुसाट मुंबई

– तिसरी मुंबई, चौथी मुंबईच्या घोषणांच्या काळात आपल्या मूळ मुंबईचा पुनर्शोध (Re-Inventing Mumbai) अत्यावश्यक असून मुंबईचा अविभाज्य भाग असलेल्या पूर्व वॉटरफ्रंट क्षेत्रातील- बीपीटीच्या सुमारे १,८०० एकरच्या जमिनीवर आंतरराष्ट्रीय उद्योजकता आणि वित्तीय केंद्र तसंच सागरी पर्यटन केंद्र उभारणार. भाजपच्या काळात मुंबईतून गुजरातला पळवले आर्थिक वित्तीय केंद्र मुंबईत पुनःस्थापित करणार. ऑलिम्पिक दर्जाची स्पोर्ट्स सिटी उभारणार. इथल्या स्थानिक नागरिकांचे जिथल्या तिथेच पुनर्वसन करणार आणि मुंबईकरांना मोकळ्या जागा (खेळाची मैदाने आणि बागा) उपलब्ध करणार.
– मुंबईचा कोस्टल रोड आणि पूर्व किनारपट्टी यांना जोडणाऱ्या रस्त्यांचं जाळं निर्माण करून मुंबईभोवती मास रॅपिड मोबिलिटीसाठी रिंगरोड ग्रिड उभारणार.
– मुंबईतील सध्याचे विकास प्रकल्प निश्चित कालावधीत पूर्ण करून अनावश्यक-कंत्राटदार प्रेमींचे- खोदकाम काम रोखणार.

> 100 युनिटपर्यंत वीज मोफत

– घरगुती वीज वापर करणाऱ्या ‘बेस्ट विद्युत’च्या ग्राहकांना १०० युनिटपर्यंत वीज मोफत देणार.
– पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये बेस्ट विद्युतच्या विस्तारीकरणासाठी विशेष योजना आखणार.

> युवा मुंबई – युवा मुंबईकर

– प्रत्येक वॉर्डात मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशी व्यायामशाळा उभारणार. जुन्या व्यायामशाळांच्या दुरुस्तीसाठी सहकार्य.
– मुंबईत आयोजित म्युझिक कॉन्सर्ट आणि आयपीएल सामन्यांसाठी ‘मुंबईकर स्टैंड’मध्ये एक टक्का आसने १८ ते २१ वयोगटातील युवा मुंबईकरांसाठी लॉटरीद्वारे मोफत.

> चॅटबॉटद्वारे प्रशासकीय सेवा

– महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळा विविध नागरी सोयी-सुविधांसाठी मुंबईकरांचा वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी महापालिकेच्या महत्वाच्या ८० सेवा चॅटबॉटद्वारे उपलब्ध करून दिल्या होत्या.
– मुंबईचं डिजिटल मॅपिंग करून डिजिटल द्विन उभारून मुंबई महापालिकेचं प्रशासन सोपं करणार.

> मुंबई महापालिकेतर्फे

– भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने या देशातील सर्वात मोठं ग्रंथालय उभारलं जाईल.