
>> स्पायडरमॅन
2026 हे वर्ष AI चे असणार हे नक्की. AI मुळे जगभरातील सर्व क्षेत्रांमध्ये मोठी क्रांती घडण्याची शक्यता आहे. उद्योग, क्रीडा, आरोग्य, वाहतूक अशा अनेक क्षेत्रांत मोठे बदल अपेक्षित आहेत. मात्र सामान्य माणसाच्या आयुष्यातदेखील या तंत्रज्ञानामुळे काही मोठे बदल अपेक्षित आहेत. मानवी आरोग्य, व्यवसाय, उत्पन्न यामध्ये AIची खूप मोठी मदत मानवाला मिळणार आहे.
आतापर्यंत फक्त स्टेप्स मोजण्यापर्यंत उपयोगात आणले जाणारे हेल्थ बॅंडस् आणि स्मार्ट वॉच आता फक्त तेव्य़ाच मर्यादेत राहणार नाहीत, तर येणाऱया काळात स्मार्ट वॉच आणि स्मार्ट हेल्थ बॅंडस् हे आणखी आधुनिक अशा सेन्सर्सनी सज्ज असतील आणि यातला AI अल्गोरिदम तुमच्या शरीरातील लहानसहान बदल सहजपणे समजून घेऊन तुम्हाला आरोग्यविषयक सल्ला देईल अथवा धोका असल्यास तशी त्वरित जाणीव करून देईल. येत्या काळात आरोग्य सुविधांचा चेहरा पूर्णपणे बदललेला असेल.
सध्या वेगाने वाढत असलेले AI टय़ुटर तंत्रज्ञानदेखील वेगाने विकसित होण्याची शक्यता आहे. AIच्या माध्यमातून कोणत्याही विषयातील ज्ञान घरबसल्या मिळवणे शक्य होणार आहे. वैयक्तिक शिक्षकाच्या रूपातदेखील हे तंत्रज्ञान आपल्याला बघायला मिळेल, जे एखाद्या विद्यार्थ्याचे अचूक मूल्यमापन करून त्याच्यातल्या उणिवा, चुका शोधेल आणि त्याला त्या दूर सारण्यासाठी, वेगाने प्रगती करण्यासाठी मदत करेल.
येणाऱया काळात AI तंत्रज्ञान मोबाईलमध्येदेखील मोठे बदल घडवेल. आता इंटरनेटच्या शिवाय तुमच्या मोबाईलमध्ये अलार्म लावणे, तुमच्या कॅलेंडरमध्ये महत्त्वाच्या दिवसांची मीटिंगची नोंद करणे, एखाद्या विषयाचे प्रेझेंटेशन तयार करणे, वेळ पडल्यास तुमच्या जागी स्वतः मीटिंग घेणे, मीटिंगमधील महत्त्वाच्या मुद्यांची नोंद करणे अशी सर्व कामे AI कोणत्याही मदतीशिवाय एकटय़ाने पार पाडेल. हे आणि असे अनेक बदल तुम्हाला येत्या वर्षात अनुभवायचे आहेत. तेव्हा नव्या अनुभवासाठी स्वतःला सज्ज करा.































































