
>> पंजाबराव मोरे
राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मराठी भाषा विभागाच्या सहकार्याने बुलढाणा येथील लोककवी वामनदादा कर्डक बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे लोककवी वामनदादा कर्डक साहित्य संमेलन देखणे झाले. काटेकोर आयोजन, वेळेचे बंधन, तब्बल 14 सत्रांची बेमालूम गुंफण आणि दोन्ही दिवस रसिकांनी ओसंडून वाहणारा सभामंडप ही या अत्यंत कमी कालावधीत पार पडलेल्या साहित्य संमेलनाची वैशिष्टय़े म्हणावी लागतील. त्यामुळे लोककवी वामनदादा कर्डक यांच्या विचारांचा दरवळ असलेल्या या संमेलनातून खऱया अर्थाने सांस्कृतिक, वैचारिक आणि प्रबोधनात्मक विचारांची उधळण झाली असेच म्हणावे लागेल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यनगरी, गर्दे वाचनालयाच्या भव्य सभागृहात कथाकार विलास सिंदगीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या संमेलनाचे उद्घाटन माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या हस्ते झाले. साहित्य संस्कृती मंडळाचे डॉ. आशुतोष पाटील, डॉ. प्रकाश होळकर, डॉ. सदानंद देशमुख, रमेश इंगळे उत्रादकर, प्राचार्य गोविंद गायकी, दिलीप जाधव, प्रतिष्ठानचे अध्यक्ष शाहीर डी. आर. इंगळे आणि संयोजक सुरेश साबळे यांच्या उपस्थितीत ठरलेल्या वेळेवर हा सोहळा पार पडला. साहित्य संमेलनांच्या इतिहासात हा आदर्शच ठरला.
सकाळी एडेड हायस्कूलमागील नगरपालिकेच्या उद्यानातील लोककवी वामनदादा कर्डक यांच्या पुतळय़ापासून संविधान सन्मान रॅली काढण्यात आली. मान्यवर साहित्यिक, ग्रंथ रथ, सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांचे पथसंचलन, लोककलावंतांचा सहभाग आणि खास सोलापुरातून आलेल्या हलगी पथकाच्या सादरीकरणाने ओसंडलेल्या उत्साहाने ग्रंथदिंडी ऐतिहासिक ठरली.
ग्रंथ प्रदर्शनातील पुस्तकांच्या स्टॉलवर रसिकांची गर्दी पाहायला मिळाली. या संमेलनातील 14 सत्रांत ‘मराठी भाषा संवर्धन’, ‘वाचन चळवळ व युवक’ आणि ‘भारतीय संविधानाची 75 वर्षे व वर्तमान समाज’, ‘अभिजात मराठी भाषा व वामनदादा कर्डक यांच्या लेखणीतील जीवनमूल्ये’ या महत्त्वाच्या विषयांवरील परिसंवादातील विठ्ठल कांगणे, डॉ. दिलीप चव्हाण, भोपाळ येथील सनदी अधिकारी व सुप्रसिद्ध साहित्यिक कैलास वानखेडे व भाषा, लिपीतज्ञ, संशोधक व नाटककार रवींद्र इंगळे चावरेकर यांची मुलाखत, शाहीर निवृत्ती तायडे व शाहीर डी. आर. इंगळे यांचा आंबेडकरी जलसा, कवी अनंत राऊत यांचा ‘कविता परिवर्तनाच्या’ अजिम नवाज राही यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन हे कार्यक्रम साहित्य रसिकांनी डोक्यावर घेतले.
लोककवी वामनदादा कर्डक यांचे पट्टशिष्य, प्रसिद्ध गायक नागसेन सावदेकर, डॉ. किशोर वाघ, डॉ. गणेश गायकवाड यांच्या अध्यक्षतेतील निमंत्रितांचे गझल संमेलन व समारोपानंतर रात्री उशिरा सुप्रसिद्ध गायिका कडुबाई खरात यांच्या कार्यक्रमास रसिकांची तोबा गर्दी झाली होती.
या संमेलनात लोककवी वामनदादा यांच्यावरील प्रासंगिक छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. यात वामनदादा कर्डकांच्या सहवासातील सर्वच कलाकारांची छायाचित्रे संकलित करण्यात आली होती. यातील एका छायाचित्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या सहीनिशी राजानंद गडपायले यांच्या काव्यावर आनंदी झाल्याचा अभिप्राय दिल्याचा फोचो आहे. या छायाचित्राशेजारी अनेक जण सेल्फी काढत होते. प्रबोधनाच्या खऱयाखुऱया उधळणीमुळे सभागृहातील गर्दी तसूभरही कमी झाली नाही. संमेलनाचे वामनदादांविषयी हृदयापासून आस्था असलेले स्वागताध्यक्ष शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सर्वच सत्रांमध्ये सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे राबून या संमेलनाचे वैभव वाढवल्याचे पदोपदी जाणवत होते. साहित्याशी आस्था आणि नाते जपणारा तुपकरांसारखा दुर्मिळ स्वागताध्यक्ष हे या संमेलनाचे ठसठशीत वैशिष्टय़ ठरले.































































