
मराठी माणसांसाठी पाच वर्षांत मुंबईत एक लाख परवडणारी घरे देणार, सर्वांना 100 युनिटपर्यंत मोफत वीज, मोफत पार्किंग, महिला-विद्यार्थ्यांना निःशुल्क ‘बेस्ट’ प्रवास आणि 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून सूट असा मुंबईच्या विकासाचा जबरदस्त ‘रोड मॅप’ आज शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि ‘मनसे’ नेते अमित ठाकरे यांनी शिवसेना-मनसे-राष्ट्रवादी युतीच्या उमेदवारांसमोर सादर केला.
शिवसेना-मनसे-राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीमुळे मुंबईत पुन्हा एकदा भगवा फडकणार असून आपला मराठीच महापौर होणार असल्याचा विश्वास या वेळी आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. आपल्यासमोर असणारे साम, दाम, दंड, भेद हे सगळे वापरून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करीत आहेत. कुठे ताटे, तर कुठे वाटय़ा वाटल्या जात आहेत, पैसे वाटले जात आहेत. मात्र आपल्याकडे तन आणि मन आहे, असे ते या वेळी म्हणाले. अनेक ठिकाणी आपल्या उमेदवारांना फोन, धमक्या येत आहेत. उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. आपण आता एकत्र राहण्यासाठी एकत्र आलो आहोत. निवडणूक आम्ही जिंकण्यासाठी लढत आहोत, मुंबई वाचवण्यासाठी लढत आहोत. मुंबई मराठी माणसाच्या हातात राहिली पाहिजे. मुंबईकर कुणासमोर झुकला नाही पाहिजे, दिल्लीसमोर तर झुकलाच नाही पाहिजे, असेही आदित्य ठाकरे या वेळी म्हणाले. भाजप सरकारच्या काळात मुंबईतील मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला जात आहे. त्यामुळे मराठी माणसासाठी घरे मुंबईतच परवडणाऱ्या दरात उपलब्ध करणार असल्याची महत्त्वाकांक्षी योजनाच त्यांनी या वेळी जाहीर केली. या सादरीकरणात मांडलेल्या सर्व गोष्टी प्रचारादरम्यान मुंबईकरांपर्यंत पोहोचवा, असे आवाहनही त्यांनी शिवसेना-मनसे युतीच्या उमेदवारांसमोर केले.
घरकाम करणाऱ्या महिलांना महिना दीड हजार
- घरकाम करणाऱया महिलांची नोंदणी करून त्यांना महिना दीड हजार रुपयांचा सन्मान निधी देणार असल्याचेही या वेळी स्पष्ट करण्यात आले.
- कोळी महिलांनाही महिना दीड हजार रुपये ‘स्वाभिमान निधी’ देणार आहे. मिंधे सरकारला क्लस्टर पॉलिसीमध्ये टाकायचे होते. मात्र कोळी बांधवांना हवे तेच करणार.
मुंबईकरांना उत्तम शहर देणार ही गॅरंटी – अमित ठाकरे
‘मनसे’चे नेते अमित ठाकरे यांनीदेखील या वेळी मुंबईच्या विकासाबाबत महत्त्वाचे मुद्दे मांडले. ‘तुम्ही नगरसेवक झाला म्हणजे मी नगरसेवक होणार. मुंबईच्या विकासासंदर्भात आता मांडलेले मुद्दे मी आणि आदित्य महापौरांकडून हट्टाने पूर्ण करून घेणार,’ असे ते म्हणाले. आता विरोधक जाहीरनामा जाहीर करून दीड-दोन हजार देण्याचे आश्वासन देतील. मात्र तुम्ही त्यांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. कारण आपल्याला पुढच्या पिढीसाठी एक उत्तम शहर बनवायचे आहे. ‘ठाकरेंचा शब्द’ हा विश्वास सार्थ ठरवून दाखवायचा आहे. मुंबईकरांना उत्तम शहर देणार ही गॅरंटी असल्याचा विश्वासही अमित ठाकरे यांनी या वेळी व्यक्त केला.
सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट
मुंबईतील जमीन मुंबईकरांच्या घरांसाठी, आंतरराष्ट्रीय दर्जाची स्वच्छतागृहे, पालिकेचे कॅन्सर रुग्णालय, सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये ‘बोलतो मराठी’ उपक्रम, गिग वर्कर्स-डबेवाल्यांना ई-बाईकसाठी 25 हजार बिनव्याजी कर्ज, कोस्टल रोड व पूर्व किनारपट्टीला जोडणाऱ्या रस्त्यांचे जाळे अशा सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट आहे.
पालिकेचे स्वतंत्र गृहनिर्माण प्राधिकरण
महापालिकेच्या मालकीचे भूखंड खासगी विकासकाच्या घशात न घालता तिथे मुंबईकरांना सेवा देणाऱया शासकीय, पालिका, बेस्ट, पोलीस कर्मचारी आणि गिरणी कामगारांना हक्काची घरे देण्यासाठी प्रयत्न करणार. यासाठी पालिकेचे स्वतंत्र गृहनिर्माण प्राधिकरण असेल.
पाच नवी वैद्यकीय महाविद्यालये
पालिकेच्या माध्यमातून शताब्दी गोवंडी, शताब्दी कांदिवली, एमटी अग्रवाल मुलुंड, भगवती बोरिवली आणि राजावाडी घाटकोपर या ठिकाणी पाच नवी वैद्यकीय महाविद्यालये सुरू करणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
‘माँसाहेब किचन’मध्ये दहा रुपयांत नाश्ता-जेवण
ठाकरे सरकारच्या काळात दहा रुपयांत शिवभोजन अशी योजना कष्टकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली. कोविड काळात या योजनेचा दर पाच रुपयांवर खाली आणला, तर काही ठिकाणी ही योजना मोफत सुरू केली होती, पण मिंधे-भाजप सरकारने ती बंद केली. मात्र शिवभोजन थाळीच्या धर्तीवर ‘माँसाहेब किचन’ योजना सुरू करण्यात येणार असून या ठिकाणी गोरगरीब, कष्टकऱयांना दहा रुपयांत नाश्ता आणि जेवण मिळणार असल्याचे आदित्य ठाकरे या वेळी म्हणाले.




























































