
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या नाकाबंदी दरम्यान कात्रज येथे सर्व्हिलन्स स्कॉड टीमने कारवाई करत तब्बल 67 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. टोयोटा हायरायडर या चारचाकी वाहनातून ही रोकड वाहतूक केली जात असल्याचे उघडकीस आले असून संबंधित वाहनही ताब्यात घेण्यात आले. शुक्रवारी सकाळी कात्रज जंक्शन येथील एसएसटी नाकाबंदी पॉईंटवर तपासणी सुरू असताना ही धडक कारवाई करण्यात आली. तपासणी दरम्यान पथकाने एमएच 12 व्ही.झेड. 4014 क्रमांकाची पांढऱया रंगाची टोयोटा हायरायडर कार थांबवली. वाहनाच्या मागील डिकीत तपासणी केली असता लाल रंगाच्या पिशव्यांमध्ये विविध चलनी नोटांचे बंडल आढळून आले. चौकशी दरम्यान सदर रक्कम ही सासवड तालुक्यातील तक्रारवाडी येथील गट क्रमांक 135 ही जमीन खरेदी करण्यासाठी रोख स्वरूपात देण्यासाठी नेत असल्याचे स्पष्टीकरण चालकाने दिले.





























































