
मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले असताना आता गुजरातमध्येही असाच प्रकार घडला आहे. गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये गेल्या काही दिवसांत दूषित पाण्याचा पुरवठा झाल्याने 100 हून अधिक मुले आजारी पडली आहेत. त्यापैकी अनेकांना टायफॉईडचा संसर्ग झाला आहे.
गेल्या तीन दिवसांत गांधीनगरमध्ये टायफॉईड आजाराने गंभीर वळण घेतले. शनिवारपर्यंत 104 संशयित रुग्णांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे या रुग्णांमध्ये सर्वाधिक संख्या मुलांची आहे. परिस्थिती गंभीर झाल्याने सिव्हिल रुग्णालयात मुलांसाठी विशेष वॉर्ड सुरू करावा लागला.सध्या सिव्हिल रुग्णालय आणि सेक्टर 24 व 29 येथील अर्बन हेल्थ सेंटरमध्ये एकूण 94 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचारानंतर 19 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. एका सहा वर्षाच्या मुलीचा टायफॉईडमुळे मृत्यू झाला असून त्याच कुटुंबातील दूसरे मूल सिव्हील रुग्णालयात उपचार घेत आहे. त्या कुटुंबातील चारही मुलांची तब्बेत बिघडल्याची माहिती मिळत आहे.
पाण्याचा दूषित नमुने
सिव्हिल हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. मीता पारीख यांनी याबाबतच्या घटनेला दुजोरा देताना गांधीनगरच्या सेक्टर 24, 25, 26 आणि 28 तसेच आदिवाडा परिसरातीत लोक दूषित पाण्याने बाधित झाल्याचे स्पष्ट केले. या भागातील पाण्याचे नमुने तपासते असता पिण्याचे पाणी पूर्णपणे असुरक्षित असल्याचे आढळून आले आहे


































































