
ट्रव्हिस हेडच्या झंझावाती दीडशतकानंतर कर्णधार स्टीव्हन स्मिथने झळकवलेले शतक आणि ब्यू वेबस्टरसह उभारलेल्या अभेद्य भागीदारीच्या जोरावर इंग्लंडच्या पहिल्या डावातील 384 धावांना ऑस्ट्रेलियाने पाचव्या आणि अंतिम अॅशेस कसोटीत चोख शतकोत्तर दिलेय. पहिल्या डावात 134 धावांची आघाडी घेत यजमानांनी सिडनीत आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. तिसऱया दिवसअखेर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 7 बाद 518 धावांवर पोहोचला असून मॅरेथॉन मोडवर असलेला हा सामना चौथ्या दिवसांपर्यंत पोहोचला असून इंग्लंड दुसऱया डावातही दमदार धावसंख्या उभारत ऑस्ट्रेलियाला चोख प्रत्युत्तर देईल अशी अपेक्षा आहे.
हेडचा झंझावात, डावाला भक्कम पाया
ऑस्ट्रेलियाच्या डावाला ट्रव्हिस हेडने गती दिली. आक्रमक फटकेबाजी, अचूक टायमिंग आणि इंग्लिश गोलंदाजांवर सातत्याने दबाव आणत हेडने दीडशतक ठोकत डावाला भक्कम पाया घातला. हेडच्या या खेळीमुळे इंग्लंडच्या गोलंदाजांचा मारा बोथट झाला आणि सामन्याची दिशा यजमानांच्या बाजूने झुकली.
तिसऱया दिवसावर स्मिथची छाप
तिसऱया दिवसाची सुरुवात ऑस्ट्रेलियाने 2 बाद 166 अशा स्थितीत केली. काल 91 धावांवर खेळत असलेल्या हेडने आपले 12 वे कसोटी शतक पूर्ण केले. मायकल नेसर (24) लवकर बाद झाला. उपाहाराला ऑस्ट्रेलिया 3 बाद 281 अशा सुस्थितीत होती. उपाहारानंतरच्या तिसऱयाच षटकात 166 चेंडूंतील 163 धावांची खेळी बेथेलने थांबवली आणि मग डावाची सूत्रे स्मिथने आपल्या हाती घेतली. स्मिथने संयम आणि आक्रमकतेचा समतोल राखत इंग्लंडच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. 108व्या षटकात ब्रायडन कार्सने ग्रीनला 37 धावांवर बाद करत भागीदारी मोडली. मात्र, स्मिथचा आक्रमक-संयमी खेळ सुरूच राहिला. 110व्या षटकात 166 चेंडूंमध्ये स्मिथने आपले 37वे कसोटी शतक पूर्ण केले आणि सिडनीतील प्रेक्षकांनी त्याचेही टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन केले.
अॅशेस इतिहासात स्मिथ दुसरा
या शतकासह स्मिथने अॅशेस मालिकेत 3644 धावा करत दुसऱया क्रमांकाचा फलंदाज होण्याचा मान मिळवला. त्याने जॅक हॉब्सचा 12 शतकांचा विक्रम मागे टाकला असून, आता त्याच्यापुढे फक्त डॉन ब्रॅडमन यांची 19 शतके आहेत. ब्रॅडमन यांनी अॅशेसमध्ये 5028 धावा केल्या आहेत.
स्मिथला ब्यू वेबस्टरची मोलाची साथ लाभली. वेबस्टरने 42 नाबाद धावांची संयमी खेळी करत स्मिथसोबत 81 धावांची अभेद्य भागी साकारली. 121व्या षटकात ऑस्ट्रेलियाने 500 धावांचा टप्पा ओलांडला. आता चौथ्या दिवशी 600 धावांचा टप्पाही गाठून इंग्लंडला दबावाखाली आणण्याचे ऑस्ट्रेलियाचे प्रयत्न असतील. त्यामुळे चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलिया आक्रमक, तर इंग्लंड सामना वाचवण्याच्या मानसिकतेत दिसू शकेल.




























































