अहिल्यानगरात मतदारांना पैशांचे वाटप उघडकीस

शहरात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी तीव्र झाली असतानाच प्रभाग क्रमांक 10 मध्ये मतदारांना पैशांचे वाटप सुरू असल्याचा गंभीर प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. या प्रकरणी पोलीस व निवडणूक भरारी पथकाने संयुक्त कारवाई करत पैसे वाटपासाठी वापरली जात असलेली वाहने ताब्यात घेतली आहेत.

तोफखाना परिसरातील सांबरगल्ली भागात काही उमेदवारांकडून खुलेआम पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप भाजपच्या उमेदवारांनी केला. या संदर्भात माहिती मिळताच भाजप उमेदवारांनी तात्काळ तोफखाना पोलीस ठाणे तसेच भरारी पथकाशी संपर्क साधून तातडीच्या कारवाईची मागणी केली.

यानंतर पोलीस व भरारी पथकाने घटनास्थळी धाव घेत संयुक्त कारवाई केली. या कारवाईदरम्यान पैसे वाटपासाठी वापरली जात असलेली वाहने ताब्यात घेण्यात आली.

निवडणुकीच्या तोंडावर प्रभाग क्रमांक 10 मध्ये घडलेल्या या घटनेमुळे राजकीय वातावरण तापले असून, पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत उमेदवारांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे.