‘बकासुरी’ राजकारण्यांविरोधात कल्याण-डोंबिवलीकर एकजुटीने लढतील, माजी आमदार राजू पाटील यांचा विश्वास

ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख असणाऱ्या कल्याण, डोंबिवली शहरांना काही बकासुरी राजकारणी गिळून टाकत आहेत. मात्र महापालिका निवडणुकीत राजकीय बकासुरांच्या ‘राजकीय वधासाठी’ कल्याण-डोंबिवलीवासीय एकजुटीने लढतील असा विश्वास कल्याण ग्रामीणचे मनसे माजी आमदार राजू पाटील यांनी केला.

राजू पाटील यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, आमच्यातील काही लोक विकले गेले, तर काही जण गुंडगिरीला घाबरून मैदान सोडून पळून गेले. मात्र आम्ही आमच्या ताकदीने आणि निष्ठेने या बकासुरी व गुंडगिरीविरोधात लढत राहणार आहोत. समाजाने या लढ्याला साथ दिली तर या राजकीय बकासुरांचा वेळीच बंदोबस्त करणे नक्कीच शक्य होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या शहरांमध्ये मूलभूत सुविधा, प्रशस्त रस्ते, विकास आराखड्याची अंमल बजावणी, उड्डाणपूल व भुयारी मार्गांची उभारणी करण्यात आली नाही. परिणामी सकाळपासून रात्रीपर्यंत कल्याण आणि डोंबिवली शहर वाहतूककोंडीने गुदमरलेले असते. हे चित्र बदलण्यासाठी निवडणुकीत भाजप, शिंदे गटाला पराभूत करून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – मनसे युतीला विजयी करण्याचे आवाहनही राजू पाटील यांनी केले.

नागरिकांची फसवणूक

ऐतिहासिक कल्याण आणि सांस्कृतिक डोंबिवली असा वारसा लाभलेल्या या शहरांचे अक्षरशः ‘अकल्याण’ झाले असून विशेषतः डोंबिवली शहराचे ‘डोम्बल’ करून ठेवण्यात आल्याची तीव्र टीका राजू पाटील यांनी केली आहे. स्मार्ट सिटी, मेट्रो सिटी अशी फक्त लेबले लावून नागरिकांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजप आणि शिंदे गटावर केला.