
नवी मुंबई – नवी मुंबई बाहेरून चांगली आणि आतून खराब असा कांगावा करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे की गेली पाच वर्षे महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती आहे. ज्यांच्या खांद्यावर या खात्याचे नेतृत्व आहे त्यांनी तरी बोलू नये, माझा मुलगा चोर आहे. शेजाऱ्यांनी बोलले तर मी समजू शकतो, असा टोला वनमंत्री गणेश नाईक यांनी विरोधकांना आज लगावला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी नवी मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांनी नवी मुंबई बाहेरून चांगली आणि आतून खराब अशी टीका केली होती. त्यांच्या या टीकेचा नाईक ऱ्यांनी जोरदार समाचार घेतला. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, नवी मुंबईचे पालकमंत्री कोण आहेत? नगर विकास खात्याचे मंत्री कोण आहेत? नवी मुंबईच्या विकासाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे तेच नवी मुंबई आतून खराब आहे असे म्हणतात. हे म्हणजे बापाने माझे अपत्य चोर आहे असे म्हणण्यासारखे आहे. शासकीय कारभारात चाललेल्या उधळपट्टीवर मी गेल्या चार वर्षांपूर्वीच जाहीर नाराजी व्यक्त केली होती. या कालावधीत झालेल्या सर्वच कामांचा हिशेब मागणार आहे. कोणत्या मूर्ख माणसाने हा युडीसीआर आणला आहे हेच कळत नाही. या एफएसआयचा अतिरेकी वापर होत असल्यामुळे नवी मुंबई शहर हे वास्तव्य करण्याजोगे राहणार नाही. सिडकोमध्ये आणि शासनामध्ये बिल्डरांचे दलाल बसले आहेत. पंतप्रधान आवास योजनेतील घराची किंमत ७२ लाख रुपये ठेवणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे असेही जोरदार फटकारे गणेश नाईक यांनी नाव न घेता एकनाथ शिंदे यांना लगावले.
































































