रोखठोक – आधी फाशी, मग चौकशी

प्रे. ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती माडुरो यांचे अपहरण केले व अमेरिकेच्या तुरुंगात डांबले. व्हेनेझुएलात लोकशाहीची हत्या सुरू आहे. माडुरो ईव्हीएमचा घोटाळा करून व निवडणूक आयोगाला हाताशी धरून सत्तेवर बसल्याचा आरोप आहे, पण असे प्रकार अनेक देशांत घडत आहेत. भारतही त्यास अपवाद नाही. म्हणून ट्रम्प भारतातही हेच उपद्व्याप करणार? भारतात तेलसाठे असते तर प्रे. ट्रम्प यांनी तेदेखील केले असते!

 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एक सनकी आणि सायको व्यक्तिमत्त्व आहेत याविषयी कुणाच्याही मनात शंका असण्याचे कारण नाही. सैन्यबळावर प्रे. ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाचे लोकनियुक्त राष्ट्रपती निकोलस माडुरो यांना त्यांच्या पत्नीसह ‘किडनाप’ म्हणजे अपहरण करून न्यूयार्कला नेले. एका सार्वभौम देशाच्या राष्ट्रपतीस बेडरूममधून उचलून नेले. अमेरिकेच्या या दादागिरीविरुद्ध स्वतःला जागतिक भाई आणि विश्वगुरू म्हणवून घेणारे लोक हात चोळत बसले आहेत. राष्ट्रपती माडुरो यांना ट्रम्प यांच्या पोलिसांनी हातकड्या घातल्या व न्यूयार्कच्या रस्त्यावरून त्यांची धिंड काढली. प्रे. ट्रम्प हे एक विकृत मनाचे माणूस आहेत व त्यांना पाठिंबा देणारे देश व त्यांचे सत्ताधारी विकृत आहेत. अमेरिकेच्या या गुंडगिरीविरुद्ध जगाने एकत्र यायला हवे होते, पण निषेध, निंदेच्या शाब्दिक बुडबुड्यांशिवाय कोणी काहीच केले नाही. माडुरो यांना न्यूयार्कच्या न्यायालयात उभे केले. माडुरो न्यायाधीशांना म्हणाले, “मी गुन्हेगार नाही. मी निर्दोष आहे. मी आजही सार्वभौम व्हेनेझुएला राष्ट्राचा राष्ट्रपती आहे. माझे अपहरण करून इथे आणले. माझ्यावरील सर्व आरोप खोटे आहेत.”

माडुरो यांच्यावर अमली पदार्थांची तस्करी, अवैध हत्यारे बाळगणे, हुकूमशाही वगैरेंचे आरोप अमेरिकेने लादले व स्वतःच फौजदार व न्यायालय बनून एका राष्ट्रपतीचे अपहरण केले. वारंट नाही, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आदेश नाही. प्रे. ट्रम्प यांचा अहंकार दुखावला हे माडुरो अटकेमागचे पहिले कारण व राष्ट्रपती माडुरो तेलाच्या व्यापारात चीन, रशिया, उत्तर कोरियासारख्या राष्ट्रांना प्राधान्य देत होते हे दुसरे कारण. इराक, सीरिया, लिबिया अशा अनेक राष्ट्रांचा व त्यांच्या राष्ट्रप्रमुखांचा विध्वंस ‘तेला’च्या साठ्यासाठी अमेरिकेने केला. त्यात आता व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींची भर पडली, पण ट्रम्प यांचा रोष पत्करून माडुरो यांनी ज्या चीन, रशियासारख्या राष्ट्रांना मदत केली ती राष्ट्रे माडुरो यांच्या सुटकेसाठी काय करत आहेत?

आरोप खरे आहेत?

अमेरिकेने जे माडुरो यांच्याबरोबर केले ते उद्या कोणत्याही राष्ट्राबरोबर आणि राष्ट्रप्रमुखांबरोबर करू शकते. माडुरो यांच्या विरुद्ध खरेच ड्रग्ज तस्करीचे पुरावे होते तर आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाऊन अमेरिकेने ‘केस’ मांडायला हवी होती व त्या कोर्टातून आदेश घेऊन कारवाई करायला हवी होती, पण अमेरिकेने माफियागिरीचा कळस गाठत स्वतःला ‘गाडफादर’ शाबीत करण्याचा प्रयत्न केला. सद्दाम हुसेनचा अमेरिकेने 2003 साली याच पद्धतीने काटा काढला. तेव्हा जार्ज बुश अमेरिकेचे राष्ट्रपती होते. सद्दामवर त्यांनी ‘वेपन आाफ मास डिस्ट्रक्शन’चा आरोप लावला. इराकवर बाम्बहल्ला झाला. सद्दामला अटक करून फासावर लटकवले, पण ज्या आरोपाखाली सद्दाम हुसेनला ठार केले ते ‘वेपन्स आाफ मास डिस्ट्रक्शन’ आजपर्यंत मिळाले नाहीत. त्याबाबतीत सद्दाम नंतर निर्दोष ठरला, पण त्याआधीच सद्दामला फासावर लटकवून अमेरिका मोकळी झाली. म्हणजे आधी फाशी, मग चौकशी. हासुद्धा तेलाचाच खेळ होता. प्रत्येक वेळेला फक्त मोहरे बदलले जातात, पण जाळे त्याच पद्धतीने फेकले जाते. लिबियाच्या गडाफीलाही त्याच पद्धतीने मारले गेले व आता कोलंबिया आणि ग्रीनलाण्ड या देशात घुसण्याचा प्रे. ट्रम्प यांचा डाव आहे. कोलंबियाचे राष्ट्रपती गुस्ताव पेट्रो यांनीही ट्रम्प यांना खुले आव्हान दिले आहे. “ए ट्रम्प, ये मला हात लावून दाखव. भेकड आणि डरपोक लेकाचा. घुसून दाखव माझ्या देशात, मी तुझी वाट पाहत आहे!”कधीकाळी माडुरोही चीनच्या भरवशावर अमेरिकेला असेच आव्हान देत होते. आज माडुरो अमेरिकेच्या कैदेत आहेत.

खरे माडुरो!

अपहरणानंतर निकोलस माडुरो हे जागतिक चर्चेचा विषय बनले आहेत. ज्यांना त्यांच्या खऱ्या कर्तबगारीविषयी माहीत नाही अशा वर्गाची सहानुभूती माडुरो यांना मिळत आहे. माडुरो यांच्यावरील कारवाईवरून त्यांच्या व्हेनेझुएला देशातच दोन ‘तट’ पडले आहेत. अमेरिकेने हुकूमशहाला उचलून नेले. आम्ही आता खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालो, असे म्हणून जल्लोष करणारा मोठा वर्ग माडुरो यांच्याच देशात आहे. माडुरो हे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाहीत. माडुरो हे गरिबीत जन्मले. बस ड्रायव्हर म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली, ती त्यांच्या देशाच्या राष्ट्राध्यक्षापर्यंत येऊन पोहोचली. भारतात मोदी सुरुवातीला लोकप्रियतेच्या ताकदीवर निवडून आले, पण पुढे त्यांना विजयासाठी ईव्हीएम, सोशल मीडियातील प्रचार, विरोधकांची बदनामी, पैशांचा व तपास यंत्रणांचा गैरवापर करून निवडणुका जिंकाव्या लागल्या. माडुरो यांनी व्हेनेझुएलात ईव्हीएम भ्रष्ट केला. निवडणूक आयोगात स्वतःचा हरकाम्या नेमला व देशाचा मीडिया ताब्यात घेतला. 2018 मध्ये माडुरो यांच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरून ‘व्होट चोर, खुर्ची सोड’ हे आंदोलन करत होती. मोदींप्रमाणेच माडुरो स्वतःला ‘अवतार पुरुष’ मानू लागले. मी एकटा सगळ्यांना भारी आहे, असे सांगून पूर्वीच्या नेत्यांना शिव्या देऊ लागले. देशाच्या इतिहासात त्यांनी छेडछाड केली. 2024 च्या निवडणुकीत माडुरो यांनी अफरातफर आणि हेराफेरी घडवून विजय मिळवला. ईव्हीएम घोटाळ्याविरुद्ध व्हेनेझुएलाच्या राजकीय कार्यकर्त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवला. एल्विस अमोरोसो हा व्हेनेझुएलाच्या निवडणूक परिषदेचा अध्यक्ष होता. तो बेशरमपणे माडुरो यांची उघड चमचेगिरी करत होता. एल्विसच्या मदतीनेच माडुरो हे सर्वच निवडणुकांत विजय संपादन करीत होते. मतदार यादी, ईव्हीएम सर्वकाही माडुरो सांगतील तसेच झाले. एल्विस अमोरोसोने व्हेनेझुएलाच्या विरोधी नेत्या मारिया मचाडो यांना निवडणूक लढवण्यावरच बंदी आणली. मारिया यांनी मोठे संघटन उभे केले व त्यांनी माडुरो यांना मोठे आव्हान उभे केले. मारिया यांनी स्वतःच्या जागी गोन्झालेझला राष्ट्रपतीपदाचा उमेदवार बनवले. निवडणुकीत रंग भरला व सर्वच ‘सर्वेक्षणात’ गोन्झालेझ यांना 60 टक्क्यांपेक्षा जास्त समर्थन असल्याचे दिसले व माडुरो यांचा पराभव करून गोन्झालेझ बहुमताने जिंकत असल्याचे स्पष्ट झाले. मतमोजणीत गोन्झालेझ यांनी आघाडी घेताच निवडणूक परिषदेचा अध्यक्ष अमोरोसोने हस्तक्षेप करून मतमोजणी थांबवली. आकडे देणे बंद केले. कारण माडुरो निवडणूक हरत होते. (असाच प्रकार भारतातील क्योटो येथेही झाला होता.) चार तासांनंतर निवडणूक परिषदेचा प्रमुख अमोरोसोने जाहीर केले की, 51 टक्के मते मिळवून माडुरो विजयी झाले व गोन्झालेझ पराभूत झाले. त्यानंतर ईव्हीएमचा सर्व डेटा उडवण्यात आला. व्हेनेझुएलाचे सुप्रीम कोर्टही माडुरो यांनी विकत घेतले होते. माडुरो यांचे सरकार बेकायदेशीरपणे सत्तेवर बसले. विरोध करणाऱ्यांना त्याने ठार केले किंवा तुरुंगात टाकले. तरीही लोक रस्त्यावर उतरून पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी करत राहिले. व्हेनेझुएलांचे सुप्रीम कोर्ट जनता आणि विरोधकांची प्रत्येक याचिका फेटाळत राहिले. माडुरो यांनी निवडणूक हायजाक केली व विजय चोरला हा विरोधकांचा आवाज दडपण्यात आला. लोकशाहीच्या मार्गाने माडुरो यांचे व्हेनेझुएलात एकछत्री राज्य व हुकूमशाही पुन्हा प्रस्थापित झाली. माडुरो यांच्या हुकूमशाहीविरुद्ध लढणाऱ्या मारिया मचाडो यांना या वर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला. मारिया यांनी हा पुरस्कार प्रे. ट्रम्प यांना अर्पण केला. व्हेनेझुएलात लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी प्रे. ट्रम्प यांना आवाहन केले. तेव्हा बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या.

माडुरो यांनी त्यांच्या देशात हुकूमशाही, व्होट चोरी, भ्रष्टाचारी पद्धतीने सत्ता आणली. तरीही तो एक सार्वभौम देश आहे. त्या देशात घुसून अमेरिकेने राष्ट्रपती माडुरो यांचे अपहरण केले. प्रे. ट्रम्प माफिया डानसारखे वागले. तसा वागण्याचा त्यांना अधिकार नाही.

व्हेनेझुएलातील लोकशाहीचा फैसला व्हेनेझुएलातच व्हायला हवा होता.

जे व्हेनेझुएलात घडले तेच भारतीय लोकशाहीत घडताना आम्ही रोज पाहतो. तरीही पंतप्रधान मोदी यांच्यावर प्रे. ट्रम्प यांच्यासारख्यांनी कारवाई करावी हे आम्हाला मान्य नाही. असे घडणे योग्य नाही! अशाने आंतरराष्ट्रीय कायदे, लोकशाही रचनेला अर्थ उरणार नाही. कोणत्याही सार्वभौम राष्ट्रात ‘माफिया’ पद्धतीने घुसणे चुकीचे आहे. संयुक्त राष्ट्रे, आंतरराष्ट्रीय न्यायालयात चर्चा न करता राष्ट्रपतींना उचलून मारण्याची नशा अमेरिकेला चढत गेली तर जगात अराजक माजेल. उद्या कदाचित सद्दामप्रमाणे माडुरो निर्दोष ठरतील तोपर्यंत त्यांना ट्रम्प जिवंत ठेवतील? म्हणजेच ‘आधी फाशी, मग चौकशी’चा खेळ सुरूच राहील.

 @rautsanjay61

[email protected]