
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दररोज आपल्या पंतप्रधानांचा व मोदींच्या भाषेत सांगायचे तर 140 कोटी भारतीयांचा नित्यनेमाने अपमान करीत सुटले असतानाही सरकारचे समर्थक मूग गिळून गप्प आहेत. आता जगातील दहा शक्तिशाली देशांच्या यादीतून हिंदुस्थान बाहेर फेकला गेला, त्यावरही सरकारचे प्रवक्ते व सोशल मीडियावरील भाटांनी मौन धारण केले आहे. भारत कसा ‘विश्वगुरू’ बनला आहे, जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था बनला आहे, याविषयी आपणच आपले कितीही ढोल बडवून पाठ थोपटून घेत असलो तरी जगातील दहा सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीतून भारताचे नाव आज गायब झाले आहे. आरत्या ओवाळून घेणाऱ्या पोकळ दाव्यांचा फुगा फुटला आहे. पॉवरफुल देशांच्या यादीतून भारताची पीछेहाट का झाली, याची कारणे आता सरकारने देशाला दिली पाहिजेत!
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे ‘विश्वगुरू’ आहेत व त्यांच्या नेतृत्वाखाली भारताची वाटचाल जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेने सुरू आहे, अशा वल्गना भारतीय जनता पक्षाची पिलावळ कायम करीत असते. मात्र मोदीभक्तीत तल्लीन झालेल्या या भाटांच्या तोंडाला कुलूप लावणारी बातमी समोर आली आहे. जगातील दहा सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीतून भारत बाहेर फेकला गेला आहे. जागतिक पातळीवर आपला दबदबा ठेवून असलेल्या देशांच्या या क्रमवारीत हिंदुस्थान बाराव्या क्रमांकावर गेला आहे. ‘वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू’ने 2026 या नव्या वर्षातील शक्तिशाली देशांची क्रमवारी रविवारी जाहीर केली. यात आंतरराष्ट्रीय पातळीवरील मानांकनात झालेली ही घसरण भारतासाठी धक्कादायकच म्हणावी लागेल. ‘जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था’ आणि ‘लष्कराच्या दृष्टीने जगातील चौथी सर्वात मोठी ताकद’ अशी बिरुदे अभिमानाने मिरवणाऱ्या भारताची अचानक शक्तिशाली देशांच्या यादीत झालेली ही पीछेहाट खजील करणारी आहे. सालाबादप्रमाणे जगातील सर्वात शक्तिशाली देश म्हणून अमेरिका या यादीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. चीन आणि रशिया हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानांवर आहेत. त्याखालोखाल ब्रिटन, जर्मनी, दक्षिण कोरिया, फ्रान्स, जपान, सौदी अरेबिया आणि इस्रायल या देशांना दहा शक्तिशाली देशांच्या यादीत स्थान मिळाले आहे. अलीकडेच जपानला मागे टाकून भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनल्याचे जाहीर करून सरकारने आपली
पाठ थोपटून घेतली
होती. एवढेच नव्हे तर सध्याच्या आर्थिक विकासाची गती अशीच कायम राहिली तर 2030 पर्यंत आपण जर्मनीलाही मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू, असे सरकारने खास निवेदन जारी करून मोठीच प्रसिद्धी मिळवली होती. हे सगळे खरे आहे तर मग अचानक ही माशी का शिंकली व दहा पॉवरफुल देशांच्या यादीतून आपण बाहेर का पडलो, याविषयीदेखील सरकारने आता एखादे निवेदन जारी करायला हवे. द. कोरिया, सौदी अरेबिया, इस्रायलसारखे तुलनेने अगदीच छोटे देश पहिल्या दहामध्ये आणि आपण मात्र बाराव्या क्रमांकावर! एक ‘विश्वगुरू’ देशाचे नेतृत्व करीत असताना असे का झाले? याचे उत्तर देशवासीयांना मिळायला हवे. ‘वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू’ शक्तिशाली देशांची क्रमवारी ठरवताना जे प्रमुख पाच निकष वापरते, त्यात भारत कुठेतरी मागे पडला म्हणूनच ‘टॉप टेन’ देशांत आपल्याला स्थान मिळू शकले नाही. जागतिक व्यापार आणि राजकारणात एखाद्या देशाचा शब्द किती पाळला जातो, त्या देशाचा राजकीय व आर्थिक प्रभाव जगावर किती आहे, हा पहिला निकष. ‘नाटो’सारख्या आंतरराष्ट्रीय लष्करी आघाड्यांमध्ये सहभाग किती आहे, प्रगत तंत्रज्ञानातील संशोधनाचा स्तर, जागतिक मंचावर असलेली देशाची ओळख व नेतृत्व करण्याची क्षमता असलेली आंतराष्ट्रीय प्रतिष्ठा आणि त्या देशाअंतर्गत शासन व्यवस्था किती स्थिर आहे, असे एकूण पाच प्रमुख मापदंड या क्रमवारीसाठी लावले जातात. या सर्वच आघाड्यांवर व कसोट्यांवर जी पारख झाली, त्यातील आनंदी आनंद पाहूनच आपले दहा शक्तिशाली देशांच्या
यादीतील नाव गायब
झाले असावे. एरवी ऊठसूट लहानमोठय़ा गोष्टींचे श्रेय घेत स्तुतीसुमने उधळून घेणारे केंद्रीय सरकार व त्यांच्या पाठीराख्यांना या घसरणीविषयी काय म्हणायचे आहे? ओमान, जॉर्डन, इथिओपिया, घाना, रवांडा वगैरे वगैरे छोट्या देशांच्या दौऱ्यावर पंतप्रधान मोदी यांचे झालेले स्वागत आणि तेथील सरकारने दिलेले सन्मान याविषयी लेखण्या झिजवून पंतप्रधान मोदी कसे ‘विश्वगुरू’ बनले आहेत, याविषयी कंठशोष करणारा भक्त संप्रदाय आता मात्र हाताची घडी तोंडावर बोट ठेवून आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दररोज आपल्या पंतप्रधानांचा व मोदींच्या भाषेत सांगायचे तर 140 कोटी भारतीयांचा नित्यनेमाने अपमान करीत सुटले असतानाही सरकारचे समर्थक मूग गिळून गप्प आहेत. बांगलादेश व नेपाळसारखे देशही हिंदुस्थानकडे डोळे वटारून बघत असताना त्यांची दातखिळी बसलेली असते व आता जगातील दहा शक्तिशाली देशांच्या यादीतून हिंदुस्थान बाहेर फेकला गेला, त्यावरही सरकारचे प्रवक्ते व सोशल मीडियावरील भाटांनी मौन धारण केले आहे. भारत कसा ‘विश्वगुरू’ बनला आहे, जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था बनला आहे, याविषयी आपणच आपले कितीही ढोल बडवून पाठ थोपटून घेत असलो तरी जगातील दहा सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीतून भारताचे नाव आज गायब झाले आहे. आरत्या ओवाळून घेणाऱ्या पोकळ दाव्यांचा फुगा फुटला आहे. पॉवरफुल देशांच्या यादीतून भारताची पीछेहाट का झाली, याची कारणे आता सरकारने देशाला दिली पाहिजेत!































































