
राज्यातील 29 महापालिका निवडणुकांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मतदानासाठी अवघे तीन दिवस उरले आहेत. महापालिका निवडणुकीत कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी हिंगोली पोलीस दलातील 200 कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. हे कर्मचारी लवकरच मुंबई, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरात पाठवले जाणार आहेत.
मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत मतदान प्रक्रिया शांतेत पार पडावी तसेच कुठेही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी राज्यातील प्रत्येक जिह्यातून पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. या पोलीस बंदोबस्तासोबतच राज्य राखीव दलाचे जवानदेखील तैनात केले जाणार आहेत. या पालिका निवडणुकीत मतदान कालावधीत तसेच मतमोजणीच्या वेळी कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस विभाग सतर्क झाला आहे. त्यासाठी स्थानिक पोलीस दलासोबतच इतर जिह्यांतील पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी बोलावण्यात आले आहेत. त्यानुसार हिंगोली जिह्यातील 200 पोलीस कर्मचारी पाठविले जाणार आहेत. यामध्ये जिह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांतर्गत काही कर्मचारी बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले आहेत.
मुंबई, नाशिकसाठी रवाना होणार
हिंगोली जिह्यातील पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱयांची निवड करण्यात आली असून हे कर्मचारी लवकरच रवाना केले जाणार आहेत. मुंबईसाठी 80 पोलीस कर्मचारी, छत्रपती संभाजीनगरसाठी 20 पोलीस कर्मचारी, तर नाशिकसाठी 100 पोलीस कर्मचारी पाठवले जाणार आहेत. हे सर्व पोलीस कर्मचारी 15 जानेवारी रोजी मतदानाच्या दिवशी 16 जानेवारीला मतमोजणीच्या दिवशी आणि 17 जानेवारीला मतदानाच्या दुसऱया दिवसापर्यंत दिलेल्या ठिकाणी तैनात असणार आहेत.






























































