
ट्रम्प यांच्या आहाराच्या सवयी अत्यंत असंतुलित असून ते सातत्याने आरोग्यास अपायकारक अन्न खातात आणि डाएट कोक पितात. ते अजून जिवंत कसे आहेत, हेच मला समजत नाही; पण ते जिवंत आहेत, असे वक्तव्य अमेरिकेचे आरोग्य सचिव रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनिअर यांनी केले.
ट्रम्प यांच्या आहाराच्या सवयींबाबत एका पॉडकास्टमध्ये बोलताना रॉबर्ट केनेडी म्हणाले की, ते मॅकडोनाल्ड्ससारखे आरोग्यास अपायकारक अन्न खातात आणि त्यानंतर पॅकबंद पदार्थ तसेच सातत्याने डाएट कोक घेतात. तुम्ही जर त्यांच्यासोबत प्रवास करत असाल, तर तुमच्या लक्षात येईल की ते दिवसभर स्वतःच्या शरीरात जणू विष भरत असतात. मात्र ट्रम्प यांचे म्हणणे आहे की ते केवळ प्रवासात असतानाच जंक फूड खातात आणि मोठ्या कॉर्पोरेशनकडील अन्नपदार्थच खातात, कारण त्यांचा त्यावर विश्वास आहे. प्रवासादरम्यान आजारी पडू नये, म्हणून ते असे अन्न निवडतात, असेही त्यांनी सांगितले.
केनेडी यांनी पुढे स्पष्ट केले की त्यांच्या मते ट्रम्प यांची शारीरिक स्थिती चांगली आहे. त्यांनी डॉ. मेहमत ओझ यांनी केलेल्या वैद्यकीय तपासणीचाही उल्लेख केला. डॉ. ओझ यांनी ट्रम्प यांचे वैद्यकीय अहवाल तपासून सांगितले की, ७० वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीमध्ये त्यांनी पाहिलेली ही सर्वाधिक टेस्टोस्टेरॉन पातळी आहे.
























































