लक्ष्य सेनची उपांत्यपूर्व फेरीत धडक

हिंदुस्थानचा अव्वल खेळाडू लक्ष्य सेनने गुरुवारी इंदिरा गांधी स्टेडियममध्ये सुरू असलेल्या इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पॅरिस ऑलिम्पिकमधील उपांत्य फेरीतील खेळाडू असलेल्या लक्ष्यने जपानच्या निशिमोटो पेंटाला पराभूत करत ही कामगिरी साधली.

सामन्याच्या सुरुवातीला लक्ष्य सेन काहीसा गोंधळलेला दिसला आणि मागे पडला, मात्र त्यानंतर त्याने खेळाची लय पकडली आणि अखेर शानदार विजय नोंदवला. पहिल्या गेममध्ये 14-18 असा पिछाडीवर असताना लक्ष्यने जोरदार पुनरागमन करत 21-19 असा विजय मिळवला. एकदा आत्मविश्वास मिळताच त्याने दुसरा गेम पूर्णपणे आपल्या ताब्यात घेत 21-10 असा एकतर्फी जिंकला. या विजयासह उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारा लक्ष्य हा एकमेव पुरुष हिंदुस्थानी एकेरी खेळाडू ठरला आहे.

प्रणॉय, श्रीकांत पराभूत

दरम्यान, हिंदुस्थानच्या इतर दोन स्टार खेळाडूंचे गुरुवारी स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. एच. एस. प्रणॉय आणि किदांबी श्रीकांत यांना दुसऱया फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. प्रणॉयला आठव्या मानांकित सिंगापूरच्या लोह कीन य्यूकडून तीन गेममध्ये 18-21, 21-19, 21-14 असा पराभव पत्करावा लागला. पहिला गेम जिंपूनही पुढील दोन गेम गमावत प्रणॉयचे आव्हान संपुष्टात आले. याचबरोबर पाचव्या मानांकित फ्रान्सच्या क्रिस्टो पोपोव्हने किदांबी श्रीकांतला 21-14, 17-21, 21-17 अशा चुरशीच्या लढतीत पराभूत केले. पहिला गेम गमावल्यानंतर श्रीकांतने दुसऱया गेममध्ये जोरदार संघर्ष करत विजय मिळवला, मात्र निर्णायक गेममध्ये तो पिछाडीवर पडला आणि स्पर्धेतून बाहेर पडला.