दिलप्रीत बाजवाच्या नेतृत्वाखाली कॅनडाची झेप, आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी कॅनडाचा संघ जाहीर

हिंदुस्थान आणि श्रीलंकेत संयुक्तपणे होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी कॅनडाने आपला संघ जाहीर केला असून दिलप्रीत बाजवाकडे संघाचे कर्णधारपद सोपवले आहे. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा बाजवा कॅनडाच्या वर्ल्ड कप मोहिमेचा प्रमुख चेहरा असेल.

आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये बाजवाने 133.22 च्या स्ट्राइक रेटने चार अर्धशतके झळकावली आहेत. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या कॅनडाच्या सुपर सिक्स्टी टी-टेन स्पर्धेत त्याने 18 चेंडूंत 57 आणि 22 चेंडूंत नाबाद 68 धावांची तडाखेबाज खेळी साकारत आपला फॉर्म दाखवून दिला होता. आतापर्यंत तो नऊ एकदिवसीय आणि सतरा टी-20 सामने खेळला आहे.

संघातील सलामीवीर युवराज सामरा हाही मोठा झंझावती फलंदाज मानला जातो. अवघ्या पंधरा टी-20 डावांत 160.72 च्या स्ट्राइक रेटने त्याने 27 षटकार लगावले आहेत. याशिवाय माजी कर्णधार साद बिन जफर, कलीम सना, डिलन हेलिगर, निकोलस कीरटॉ आणि नवनीत धालीवाल यांचा अनुभव संघासाठी मोलाचा ठरणार आहे.

विश्वचषकामध्ये कॅनडाचा समावेश ‘ड’ गटात करण्यात आला असून दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि अमेरिका हे संघ त्यांच्या गटात खेळणार आहेत. कॅनडाचे सर्व साखळी सामने हिंदुस्थानात होणार असून 9 फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या सामन्याने त्यांच्या वर्ल्ड कप मोहिमेला प्रारंभ होईल.

टी-20 वर्ल्ड कपसाठी कॅनडाचा संघ

दिलप्रीत बाजवा (कर्णधार), अजयवीर हुंडल, अंश पटेल, डिलन हेलिगर, हर्ष ठाकर, जसकरनदीप बुट्टर, कलीम सना, कंवरपाल ताथगुर, नवनीत धालीवाल, निकोलस कीरटॉ, रविंदरपाल सिंह, साद बिन जफर, शिवम शर्मा, श्रेयस मोव्वा आणि युवराज सामरा.