दुखापतीमुळे सुंदरचा वर्ल्ड कप वाईट होणार; आगामी मालिकेतून बाहेर, आता वर्ल्ड कपलाही मुकण्याची शक्यता

न्यूझीलंडविरुद्ध होणाऱया पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतून हिंदुस्थानचा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर बाहेर पडला आहे. 21 ते 31 जानेवारीदरम्यान खेळली जाणारी ही मालिका 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱया टी-20 विश्वचषकाच्या तयारीचा महत्त्वाचा भाग मानली जात होती. त्यामुळे सुंदरच्या अनुपस्थितीमुळे त्याच्या विश्वचषकातील सहभागाबाबतही साशंकता निर्माण झाली आहे.

बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वडोदऱयात न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात सुंदरचा स्नायू ताणला गेला होता. बीसीसीआयने ही दुखापत डाव्या खालच्या बरगडीजवळ झाल्याचे सांगितले होते. सध्या सुंदर या दुखापतीतून सावरत असून ही समस्या टी-20 विश्वचषकात त्याच्या खेळावर परिणाम करेल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हिंदुस्थान 7 फेब्रुवारी रोजी मुंबईत अमेरिकेविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे.

दरम्यान, दिल्लीचा फलंदाज अष्टपैलू आयुष बदोनीला एकदिवसीय मालिकेसाठी सुंदरच्या जागी संघात संधी देण्यात आली आहे. मात्र त्याला टी-20 संघातही स्थान मिळेल की नाही, याबाबत निवड समितीने अद्याप कोणताही अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत सुंदर नसल्याने हिंदुस्थानला फारशी चिंता करावी लागणार नाही. कारण पुढील आठवडय़ात अनेक प्रमुख अष्टपैलू संघात उपलब्ध होणार आहेत.

हार्दिक पंडय़ा सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे, तर अक्षर पटेल, अभिषेक शर्मा आणि शिवम दुबे हेही मालिकेसाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे संघाचा समतोल टिकून राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेसाठी हिंदुस्थानचा संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), तिलक वर्मा (पहिले तीन सामने उपलब्ध नाही), हार्दिक पंडय़ा, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), रिंकू सिंग, जसप्रीत बुमरा, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, आयुष बदोनी, ईशान किशन (यष्टिरक्षक).

टी-20 विश्वचषक 2026 साठी हिंदुस्थानचा संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, ईशान किशन, हार्दिक पंडय़ा, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग.