
यंदाची मुंबई मॅरेथॉन मुंबईच्या डबेवाल्यांच्या अनोख्या सहभागामुळे रंगतदार ठरणार आहे. 21 व्या आवृत्तीत तब्बल 250 डबेवाले रविवारी अंतिम रेषेवर उभे राहून धावपटूंना अल्पोपाहार वाटत त्यांचा उत्साह वाढवतील. टीमवर्पसाठी जगभर प्रसिद्ध असलेले मुंबईचे डबेवाले मॅरेथॉनच्या मूल्यांशी अगदी सुसंगत ठरतात. शर्यतीच्या अखेरच्या टप्प्यात धावपटूंना मिळणारा हा पाठिंबा त्यांच्या मेहनतीला बळ देणारा असेल. नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी या सहभागाला शहरसेवेचा मान असल्याचे सांगितले.




























































