
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आज झालेल्या मतदानाचा टक्का 2017 च्या निवडणुकीच्या तुलनेत 2 ते 3 टक्क्यांनी घटल्याचे दिसते. मुंबईत अंदाजे 53 टक्के मतदान झाले. राज्यात अनेक शहरांत उडालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य वादाच्या शक्यतेमुळे राज्य निवडणूक आयोगाने अंतिम आकडेवारी रात्री उशिरापर्यंत दिली नाही. या लपवाछपवीवर विरोधी पक्षांकडून आक्षेप घेण्यात आला.
29 महापालिकांत सकाळी 9.30 वाजेपर्यंत सरासरी 7.03 टक्के, सकाळी 11.30 वाजेपर्यंत 17.41 टक्के, 1.30 वाजेपर्यंत 29.22 आणि 3.30 वाजेपर्यंत 41.13 टक्के मतदान झाले. मात्र त्यानंतर अंतिम आकडेवारी शुक्रवारी जाहीर करणार असल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले. मुंबईत 53 टक्के, ठाण्यात 57 टक्के, नवी मुंबईत 53 टक्के, नाशिकमध्ये 55 टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे.
दरम्यान, 2017 मध्ये मुंबई महानगरपालिकेसाठी 56 टक्के मतदान झाले होते. यंदा मुंबईत दुपारी 3.30 वाजेपर्यंत 41.06 टक्क मतदान झाल्याचे आयोगाने जाहीर केले.
म्हणून आकडेवारी लपवली
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीवेळी मतदाना दिवशी जाहीर केलेली टक्केवारी आणि दुसऱया तिसऱया दिवशी दिलेल्या टक्केवारीत मोठी तफावत होती. त्यावर विरोधी पक्षांकडून आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे आयोगाने यावेळी मतदानादिवशी अंतिम आकडेवारी जाहीर करणे टाळल्याचे बोलले जात आहे.
- ठाणे – 57 टक्के
- कल्याण – 49 टक्के
- नवी मुंबई – 53 टक्के
- नाशिक – 55 टक्के





























































