
लालबाग, परळ, करी रोड, लोअर परळ, वरळी, प्रभादेवी हा गिरणगाव म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसैनिक, शिवसेनाप्रेमी आणि गिरणगावकरांनी तो अभेद्य ठेवला. तिथे निष्ठावंतांचाच आवाज घुमला.
शिवडी विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 204 मध्ये शिवसेनेने शाखाप्रमुख किरण तावडे यांना मैदानात उतरवले होते. त्यांच्या विरोधात शिवसेनेतून शिंदे गटात गेलेले अनिल कोकीळ होते, मात्र शिवडी, लालबागकरांनी गद्दारांना गाडण्याची परंपरा कायम राखली. किरण तावडे कोकीळ यांना धूळ चारून 11,143 मते मिळवून विजयी झाले.
शिवसेनेतून भाजपमध्ये आणि नंतर एकनाथ शिंदे गटात गेलेले नाना आंबोले यांनाही मतदारांनी पुन्हा नाकारले. परळच्या प्रभाग क्रमांक 206 मध्ये शिवसेनेचे सचिन पडवळ यांनी आंबोलेंना चारीमुंडय़ा चीत करून दणदणीत विजय मिळवला. पडवळ यांना 12,989 मते मिळाली.
परळमध्येच प्रभाग क्रमांक 203 मध्ये शिवसेनेच्या उमेदवार श्रद्धा पेडणेकर यांनी मिंधे गटाच्या समिधा भालेकर यांचा पराभव केला. पेडणेकर यांना घसघशीत 16,541 मते मिळाली. शिवडीच्या प्रभाग क्रमांक 202 मध्ये शिवसेना उमेदवार, माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी 11,143 मते मिळवून भाजपच्या पार्थ बावकर यांचा पराभव केला. प्रभाग क्रमांक 205 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार सुप्रिया दळवी यांनी भाजपच्या वर्षा शिंदे यांना पराभूत करून विजयी गुलाल उधळला.
भायखळय़ात प्रभाग क्रमांक 208 मधील मतदारांनी यावेळी पुन्हा एकदा शिवसेनेचे रमाकांत रहाटे यांच्या गळय़ात विजयाची माळा घातली. मिंधे गटाच्या विजय लिपारे यांचा पराभव करून रहाटे 4188 च्या मताधिक्याने विजयी झाले. प्रभाग क्रमांक 210 मध्येही शिवसेनेच्या सोनम जामसुतकर विजयी झाल्या. प्रभाग क्र. 220 मधून शिवसेनेचे संपदा मयेकर यांनी बाजी मारली.
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही पुन्हा एकदा मैदान मारले. प्रभाग क्रमांक 199 मध्ये किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटाच्या उमेदवार रुपल राजेश कुसळे यांचा दारुण पराभव केला. पेडणेकर या महापालिका निवडणुकीत पाचव्यांदा निवडून आल्या आहेत. शेजारच्याच प्रभाग क्रमांक 198 मध्ये शिवसेनेच्या अबोली खाडे यांनी विजय मिळवला.
शिवसेना आणि मनसेच्या उमेदवारांनी भाजप आणि शिंदे गटाच्या उमेदवारांना पाणी पाजून भगव्याची शान कायम राखली. शिवसेनेच्या मशालीच्या तेजात सत्ताधाऱ्यांची कारस्थाने बेचिराख झाली आणि शिवसेना-मनसे-राष्ट्रवादी काँग्रेस शिवशक्ती युतीने जोरदार बाजी मारली.
लालबाग, परळ, भोईवाडा, शिवडी, लोअर परळ, डिलाईल रोड, वरळी या गिरणगावामध्ये शिवसेनेने उमेदवारी देताना निष्ठावंतांनाच प्राधान्य दिले होते. त्यांना मतदारराजाने भरभरून मतदान केले.
गिरणगावात शिवशक्तीने दणदणीत विजय मिळवत सात जागा जिंकल्या. मोठय़ा मताधिक्याने शिवसेना-मनसेचे उमेदवार विजयी झाले. भायखळय़ात दोन तर गिरगावात शिवशक्तीने एक जागा जिंकली.






























































