
श्रवरी परब यांचा दणदणीत विजय
प्रभाग क्रमांक 88मधून जोरदार विजय मिळवत शिवसेनेच्या श्रवरी सदा परब यांनी भाजपच्या डॉ. प्रज्ञा प्रसाद सामंत यांचा पराभव केला. या प्रभागात राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट), वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते तर चार अपक्ष उमेदवार होते. श्रवरी परब यांनी 10 हजार 675 मते मिळवत विजय मिळवला. डॉ. सामंत यांना 7 हजार 134 मते मिळाली. या विजयानंतर शिवसेना-मनसे-राष्ट्रवादी युतीच्या कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष केला.
हरी जगन्नाथ शास्त्री यांच्याकडून भाजप उमेदवाराचा दारुण पराभव
मुंबई- प्रभाग क्रमांक 95 मधून शिवसेनेचे उमेदवार हरी जगन्नाथ शास्त्राr यांनी 10 हजार 563 मते मिळवत दणदणीत विजय मिळवला. भाजपचे उमेदवार सुहास आडिवरेकर यांचा दारुण पराभव करत हरी शास्त्री यांनी मशाल पेटवली आहे. या प्रभागात वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिला होता तर राष्ट्रवादी पांग्रेसनेही नशिब आजमवले. दोन अपक्ष उमेदवार रिंगणात होते. मतदारांनी मात्र शिवसेनेला कौल दिला. भाजपचे आडिवरेकर यांना 6 हजार 644 मते मिळाली.
रोहिणी कांबळे यांच्याकडून शिंदे उमेदवाराचा पराभव
प्रभाग क्रमांक 93मध्ये शिवसेनेच्या रोहिणी कांबळे यांनी जोरदार विजय मिळवत शिंदे गटाचे सुमित वजाळे यांचा दारुण पराभव केला. रोहिणी कांबळे यांना 10 हजार 268 मते मिळाली तर वजाळे यांना 6 हजार 50 मते मिळाली. या प्रभागात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (आठवले गट) उमेदवार दिला होता. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह (अजित पवार गट) पाच अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.
प्रज्ञा भुतकरांचा दणदणीत विजय
प्रभाग क्रमांक 94मध्ये शिंदे गटाला पराभूत करत शिवसेनेच्या प्रज्ञा भुतकर यांनी विजय मिळवला. प्रज्ञा भुतकर यांना 10 हजार 337 मते मिळाली, तर शिंदे गटाच्या पल्लवी पै-सरमळकर यांना 7 हजार 977 मतांवर समाधान मानावे लागले. या प्रभागात काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससह (अजित पवार गट) समाजवादी पार्टीने उमेदवार दिले होते. तर दोन अपक्ष उमेदवार होते. मुख्य लढत भुतकर व पै-सरमळकर यांच्यातच झाली.































































