छत्रपती संभाजीनगरमध्ये, पैसा जिंकला, मतदार हरला! भाजप बहुमतापासून ‘वंचित’

छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणूक आयोगाच्या कृपेने पैसा जिंकला आणि मतदार हरला. एमआयएमने एकूण 33 जागांवर विजय मिळवला. भाजपने 57 जागा मिळवल्या; परंतु स्पष्ट बहुमतापासून भाजप ‘वंचित’ राहिली. अफाट पैसा उधळूनही मिंध्यांना 13 जागांवरच समाधान मानावे लागले. शिवसेनेचे सहा उमेदवार निवडून आले.

वंचित बहुजन आघाडीला पाच जागांवर यश मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने शहरात 80 ठिकाणी उमेदवार उभे केले होते. यापैकी एकही उमेदवार विजयी झाला नाही.

शिवसेनेचे सहा उमेदवार विजयी

छत्रपती संभाजीनगर महापालिकेत शिवसेना पक्षाचे गणेश लोखंडे, रशीद मामू, सावित्री वाणी, सुनीता सोनवणे, वैशाली कोरडे, सचिन खैरे, नवीन ओबेरॉय हे उमेदवार मोठय़ा फरकाने विजयी झाले. सीताराम सुरे, बन्सी जाधव, राजेंद्र दानवे, रमेश दहिहंडे, हरिभाऊ हिवाळे, छाया देवराज, वंदना कुलकर्णी, प्राजक्ता भाले, स्वाती खडके आदी उमेदवार पराभूत झाले.

नांदेडात भाजपची एकहाती सत्ता

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपने एकहाती सत्ता आणत 45 जागांवर विजय मिळविला असून, दुसऱया क्रमांकावर एमआयएमने मुसंडी मारत 14 जागांवर विजय मिळविला आहे. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या 20 प्रभागांतील 81 जागांसाठी काल निवडणूक झाली. भाजपने 45 जागांवर विजय मिळवीत स्पष्ट बहुमत मिळविले आहे. त्याखालोखाल एमआयएम पक्षाने 14 जागांवर विजय मिळविला आहे. 2012 साली एमआयएमने 12 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने 10, राष्ट्रवादी काँग्रेसने 2, शिवसेना शिंदे गटाने 4, वंचित बहुजन आघाडीने 5 जागा मिळविल्या, तर अपक्षाने एका जागेवर विजय मिळविला आहे.

जालन्यात मिंध्यांना फक्त 12 जागा

 जालना महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीचा कौल भाजपच्या बाजूने लागला. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले माजी आमदार पैलास गोरंटय़ाल यांच्या नेतृत्वाखाली भाजपने 65 पैकी 41 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले. मिंधे गटाला 12 तर काँग्रेसला 9 जागांवर समाधान मानावे लागले. एमआयएमला दोन जागा मिळाल्या, तर एका अपक्षाचीही लॉटरी लागली. जालना महापालिका घोषित झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती. जागावाटपात ताणाताणी झाल्यानंतर भाजप आणि मिंध्यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. पैलास गोरंटय़ाल यांच्या नेतृत्वात भाजपने 41 जागांवर विजय मिळवून स्पष्ट बहुमत मिळवले. मिंध्यांची घोडदौड 12 जागांवरच थांबली.

 

पक्षीय बलाबल

भाजप 57

एमआयएम 33

शिवसेना 6

मिंधे गट 13

वंचित बहुजन आघाडी  4

काँग्रेस 1

अजित पवार गट  0

शरद पवार गट 1