मिंधेंना फुटीची धास्ती! मुंबईतील नवनिर्वाचित नगरसेवकांना पंचतारांकित हॉटेलमध्ये पाठवले

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवशक्तीने महापालिका निवडणुकीत आपली ताकद दाखवून दिली आहे. या निवडणुकीत मिंधेंचे 29 नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र, मिंधेंना निवडून आलेल्या नगरसेवकांवरच विश्वास नसल्याचे दिसून आले आहे. नवनिर्वाचित नगरसेवक फुटण्याची भीती मिंधे यांना वाटत आहे. त्यामुळे त्यांनी मुंबईतील त्यांच्या गटाच्या नगरसेवकांना पंचतारांकित हॉटेलमध्ये पाठवले आहे. तसेच त्यांना पुढील तीन दिवस हॉटेलमध्येच ठेवण्यात येणार आहे.

भाजपला मुंबई महापालिका निवडणुकीतील सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी त्यांना स्वबळावर सत्तास्थापन करण्याएवढे बहुमत मिळवता आले नाही. त्यामुळे त्यांना मिंध्यांची गरज लागणार आहे. त्यामुळे आपल्या गटात फूड पडण्याची भीती मिंधे यांना सतावत आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. महापालिकेत सत्ता स्थापनेचा औपचारिक दावा दाखल होईपर्यंत नगरसेवकांना एकत्र ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे.

या संपूर्ण घटनेवरून काँग्रेस खासदार नसीर हुसेन यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. ते कोणाला घाबरतो? त्यांचे नगरसेवक कोण तोडू शकतो? आणि खासदार, आमदार, नगरसेवक तोडण्याचा सर्वात जास्त अनुभव कोणाला आहे, हे सर्वांना माहिती आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. भाजप नेहमीच त्याच्या मित्रपक्षांच्या आणि फुटलेल्या नेत्यांच्या जोरावर वाढला आहे, असेही ते म्हणाले.