
हिंदुस्थानचा प्रजासत्ताक दिन सोहळा खलिस्तानी आणि बांगलदेशच्या दहशतवादी संघटनांच्या निशाण्यावर आहे. दिल्लीसह देशातील काही शहरांमध्ये हे दहशतवादी हल्ले घडवून आणण्याच्या तयारीत असल्याचा इशारा गुप्तचर संस्थांनी दिला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतिबंधित खलिस्तानी संघटना आणि बांगलादेशातील दहशतवादी यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आत्मघाती हल्ले घडवू शकतात. दिल्लीत 10 नोव्हेंबर 2025 रोजी लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये आत्मघाती बॉम्बस्पह्ट झाला होता. त्याच प्रकारे स्पह्ट घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा कट आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत संवेदनशील आणि गर्दीच्या परिसरात पोलिसांनी मॉकड्रिल केली. प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पाहण्यासाठी हजारो नागरिक कर्तव्य पथवर उपस्थित असतात. त्यामुळे या भागावर पोलिसांचे लक्ष राहणार आहे.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सातत्याने मॉकड्रिल्स
दहशतवादी हल्ल्याच्या इशाऱ्यानंतर दिल्ली पोलिसांनी पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन सातत्याने मॉकड्रिल्स घेतल्या जात आहेत. 3 जानेवारीला लाल किल्ल्याजवळ बॉम्बस्पह्टाची तालीम घेण्यात आली. त्यानंतर 7 जानेवारीला मेट्रो स्थानक, 10 जानेवारीला कश्मिरी गेटजवळ मॉकड्रिल घेण्यात आली. उत्तर दिल्लीत ऐतिहासिक स्थळे आणि बाजारपेठा जास्त आहेत. या ठिकाणी मोठी गर्दी होते. त्यामुळे या भागात कडक पहारा देण्यात येत आहे.
दहशतवादी संघटनांना गॅगस्टर्सची मदत
पंजाब, हरयाणातील गँगस्टर खलिस्तानी दहशतवादी संघटनांसाठी काम करत असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी म्हटले आहे. हरयाणासह दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये सक्रिय असलेले गँगस्टर दहशतवादी संघटनांसोबत हातमिळवणी करत आहेत. या संघटनांसाठी ते ‘फुट सोल्जर’च्या भूमिकेत काम करत आहेत. त्यांच्या गुन्हेगारी नेटवर्पचा वापर करून दहशतवादी संघटना देशात घातपात घडवून आणण्याच्या तयारीत आहेत.


























































