मध्य रेल्वेवर आज प्रवाशांची त्रेधातिरपीट, सीएसएमटी ते विद्याविहार पाच तासांचा मेगाब्लॉक

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी प्रवाशांची त्रेधातिरपीट उडणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामे करण्यासाठी उपनगरीय मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान पाच तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या अवधीत धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे धिम्या लोकलसह जलद लोकलचे वेळापत्रक कोलडण्याची शक्यता आहे.

मागील अनेक दिवसांपासून मध्य रेल्वेच्या रखडपट्टीमुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या आठवडय़ात सीएसएमटी येथे प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. त्यानंतरही वेळापत्रक ‘रुळावर’ आलेले नाही. अशातच प्रवाशांना दर रविवारी मेगाब्लॉकचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. 18 जानेवारीला पाच तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. सीएसएमटी येथून सकाळी 10.48 ते दुपारी 3.45 या वेळेत सुटणाऱ्या डाऊन धिम्या मार्गावरील सेवा सीएसएमटी आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.

सीएसएमटी ते पनवेलठाणे ते पनवेल सेवा रद्द

हार्बर मार्गावर रविवारी सीएसएमटी ते पनवेल आणि ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते पनवेलदरम्यान ब्लॉक घेण्यात आला आहे. पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 या वेळेत सीएसएमटीकडे सुटणाऱ्या तसेच सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या लोकल सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत रद्द राहतील. तसेच पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 या वेळेत ठाण्याकडे जाणाऱ्या लोकल तसेच ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 या वेळेत पनवेलकडे जाणाऱ्या लोकल सेवा रद्द असेल. ठाणे ते वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान लोकल सेवा तसेच बेलापूर/नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट मार्गावरील सेवा उपलब्ध राहील, असे मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.