खचू नका, आपण त्यांना पुरून उरू! – राज ठाकरे

पालिकेची यावेळची निवडणूक अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती. पण अशा लढाईतसुद्धा दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नाही याचं दुःख आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही. आपण त्यांना पुरून उरू, असा ठाम विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज व्यक्त केला.

पालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज ठाकरे यांनी ‘एक्स’वर पोस्ट करीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. शिवसेना आणि ‘मनसे’च्या निवडून आलेल्या नगरसेवकांचे सर्वप्रथम त्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळची निवडणूक सोपी नव्हती. आपल्या उमेदवारांनी जो लढा दिला त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, असे राज ठाकरे म्हणाले. आपले जे नगरसेवक निवडून आलेत ते तिथल्या तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की, असेही ते म्हणाले.

‘ते’ मराठी माणसाला नागवतील!

निवडणुकीत अपेक्षित यश का मिळाले नाही, बाकी काय चुकलं, काय कमी पडलं आणि काय करावं लागेल याचं विश्लेषण आणि कृती आपण सगळे मिळून करू. एमएमआर परिसरासह संपूर्ण राज्यात मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत. त्यामुळे आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं रहायचं आहे.

“आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची, मराठी अस्मितेसाठीची आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची लढाई आहे. ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे. अशा लढाया या दीर्घकालीन असतात याचं भान तुम्हा सगळ्यांना आहे. लवकरच भेटूया. पुन्हा कामाला लागूया.”