
मुंबईसह राज्यात झालेल्या महापालिकांच्या निवडणुकीत काही मतदारसंघांत प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मोजणी करण्यात आलेल्या मतांमध्ये मोठय़ा प्रमाणात फरक असल्याचे आढळून आले. काही मतदारसंघांत झालेल्या मतदानापेक्षा कमी मतांची मोजणी करण्यात आली, तर काही ठिकाणी जास्त मते आढळून आल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने भाजपचा विजय म्हणजे जनतेचा कौल की ईव्हीएमचा खेळ असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ईव्हीएममधून हजारो मते गायब झाल्याने मुंबई, पुण्यातील उमेदवारांनी संताप व्यक्त केला आहे.
मुंबई महापालिकेच्या दहिसर प्रभाग 3 मधून निवडणूक लढलेल्या शिवसेना उमेदवार रोशनी कोरे-गायकवाड यांनी मतमोजणीच्या आकडेवारीतील हेराफेरीबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. प्रभाग क्र.3 मध्ये एकूण मतदान 26,651 झाले होते. मतमोजणीच्या सर्व फेऱया पूर्ण झाल्यावर फक्त 19 हजार मतांची मोजणी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्यावेळी आम्ही आक्षेप नोंदवत 7 हजार मते कुठे गेली, याबाबत विचारणा केल्यावर पुन्हा फेरमतमोजणी घेण्यात आली. त्यावेळी त्यातील काही मतदान पुढे आले. त्यानंतरही एकूण मतांची टॅली होत नव्हती. त्यानंतर लक्षात आले की एका ईव्हीएमची मतमोजणी केलीच नाही, हा सर्व प्रकार संशयास्पद असल्याचा संताप गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे भाजपचा विजय म्हणजे जनतेचा काwल की ईव्हीएमचा खेळ, असा सवाल उपस्थित होत आहे.
निवडणूक विभागाच्या आकडेवारीतील मते कमी कशी झाली – वसंत मोरे
पुण्यातील प्रभाग क्रमांक 38 मध्ये 79826 मतदान झाल्याचे निवडणूक विभागाकडून प्रसिद्धीपत्रक काढून जाहीर करण्यात आले होते. तर प्रत्यक्षात मतमोजणीच्यावेळी 78,719 मतदानाची मोजणी करण्यात आली. मतमोजणी करताना 1,107 मते कमी कशी झाली, असा सवाल शिवसेना उमेदवार वसंत मोरे यांनी केला आहे. यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन न्यायालयीन लढाई लढणार असल्याचे मोरे यांनी सांगितले.
मतमोजणीच्या चौथ्या फेरीपर्यंत माझ्या आणि भाजप उमेदवारांच्या मतांत फार कमी अंतर होते. पाचव्या, सहाव्या आणि सातव्या फेरीनंतर माझ्याकडे 94 मतांचे लिड होते. आठव्या फेरीला 1 आणि 4 क्रमांकाचे मशीन बंद पडले. त्यावेळी आमच्या कार्यकर्त्यांनी मशीन बदलून मोजणी करण्यास विरोध केला. प्रांत अधिकाऱ्यांनी मला बोलावून घेतले आणि बंद पडलेल्या मशीनमधील चीप दुसर्या मशीनमध्ये टाकून मतांची मोजणी केली. त्यावेळी मशीनवर दुसरा नंबर आला. मशीन बदलल्यानंतर माझे लिड आधीपेक्षा वाढून 740 झाले आणि शेवटच्या राऊंडमध्ये 1011 मतांचे विरोधी उमेदवाराला मिळाले हा सर्व प्रकार संशयास्पद आहे. मतदानाच्या दिवशी शेवटच्या दोन तासांत 16 टक्क्यांनी मतदान वाढले. त्यानंतर रात्री उशीरा प्रसिद्ध केलेल्या मतदानाची आकडेवारी आणि प्रत्यक्ष मतमोजणीतून पुढे आलेली आकडेवारी यामध्ये हजारो मतांची तफावत कशी? असा सवाल मोरे यांनी केला आहे.
ईव्हीएम मशीन बदलून निकाल फिरवला – वैशाली पाटणकर
मतमोजमीच्या पाचव्या फेरीर्यंत मी आघाडीवर होते. सहाव्या फेरीला ईव्हीएम मशीन बदलून निकाल फिरविण्यात आल्याचा संशय माहीम प्रभाग 190 मधील शिवसेना उमेदवार वैशाली पाटणकर यांनी व्यक्त केला आहे. मतमोजणीत तफावत आढळल्याने फेरमतमोजणीची मागणी करण्यात आली होती. मात्र, ती मान्य न करता भाजप उमेदवार शीतल गंभीर यांच्या विजयाची घोषणा करण्यात आली. या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे पाटणकर म्हणाल्या.
मुंबईत काँग्रेसला मिळालेलं यश फिक्सिंग – हर्षवर्धन सपकाळ
मुंबईत भाजपला मिळालेले यश हे फिक्सिंगचा भाग आहे. प्रभाग रचनेपासून पाडू नावाच्या मशीनपर्यंत व शाईचा घोळ हा सर्व फिक्सिंगचा खेळ होता. निवडणूक आयोगाने सारवासारव करणे बंद करावे तसेच भाजपच्या इशाऱयावर चालणे बंद केले पाहिजे. भाजपकडे कसलीही नैतिकता, लाज राहिलेली नाही. लोकशाही खरोखरच संकटात आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही, पाकीट वाटप, बोगस मतदार, उमेदवारांची पळवापळवी व निवडणूक आयोगाचा गलथान कारभार हे सर्व पाहता फ्री अँड फेअर निवडणुका होत नाहीत हे स्पष्ट दिसले, असे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
टपाली मतदान आधीच उघडले
दहिसर प्रभाग क्रमांक 3 मध्ये ज्या मतदारांनी टपाली मतदान केले होते त्या मतदानाच्या लिफाफ्यांचे सील आधी उघडण्यात आले होते. यासंदर्भात आक्षेप नोंदविल्यावर संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी मोजणीआधीचे सीसीटीव्ही फुटेज दाखवले. त्यामध्ये कुठेही सील उघडताना दिसले नाही, असे रोशनी कोरे-गायकवाड म्हणाल्या. त्यामुळे कोरे यांनी निकालावर आक्षेप नोंदवला.































































