
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात इंडिगोची हजारो उड्डाणे रद्द झाली होती. या प्रकरणात नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) विमान वाहतूक कंपनी इंडिगोवर मोठी कारवाई केली आहे. नव्या नियमांच्या अंमलबजावणीत प्रचंड निष्काळजीपणाचा ठपका ठेवत डीजीसीएने इंडिगोला 22 कोटी रुपयांचा दंड ठोठावला असून कंपनीचे सीईओ पीटर अल्बर्स यांच्यासह कंपनीच्या दोन वरिष्ठ अधिकाऱयांना तंबी दिली आहे. नियमांचे पालन करण्यात अपुरी पूर्वतयारी आणि व्यवस्थापनाचा ठपका या अधिकाऱयांवर ठेवला आहे. याशिवाय कंपनीच्या वरिष्ठ उपाध्यक्षांना कार्यपालनाशी संबंधित सर्व जबाबदाऱयांवरून हटवण्यात आले आहे.
डिसेंबरच्या दोन आठवडय़ांमध्ये इंडिगोची 5 हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द झाली होती. यासंदर्भात डीजीसीएने चार सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली होती. समितीने दिलेल्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. इंडिगोला 50 कोटी रुपयांची बँक हमीदेखील जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
इंडिगोमध्ये आढळल्या या त्रुटी
समितीला इंडिगोच्या ऑपरेशनल नियंत्रणात गंभीर त्रुटी आढळल्या. कंपनीचे व्यवस्थापन ते ओळखू शकले नाही. पुरेसे बफर ठेवले नाही. नव्या नियमांनुसार नियोजन केले नाही. पायलट, विमाने आणि उपलब्ध संसाधनांच्या अति ऑप्टीमायझेशनचा ठपका डीजीसीएने ठेवला आहे. कंपनीने डय़ुटी वेळ जास्तीत जास्त करण्यासाठी कर्मचाऱयांचे वेळापत्रक तयार केले. त्यामुळे रोस्टर कमकुवत झाले आणि उपलब्ध मनुष्यबळ अचानक कमी झाले. याचा फटका विमानसेवेवर झाला.






























































