
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाला चार दिवस झाले तरी मुंबईत महापौर कोणाचा होणार हे स्पष्ट झालेले नसून, याबाबत सस्पेन्स वाढत चालला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर आहेत तर, शिंदे गटाने आपले नगरसेवक पंचतारांकित हॉटेलमध्ये कोंडून ठेवले आहेत. पडद्यामागे बऱ्याच घडामोडी होत असून यावर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फोडाफोडीचा खेळत आता भाजप आणि शिंदे गटातच होणार आहे, असे संजय राऊत सोमवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले. तसेच महापौर पदावर दावा सांगा म्हणून शिंदेंना दिल्लीतून चावी देणारा कोण? असा सवालही त्यांनी केला.
कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबईत शिंदे गटाचा महापौर होणार नाही. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणादरम्यान म्हणाले की, पहिल्यांदाच मुंबईत भाजपचा महापौर बसणार आहे. म्हणजे दिल्लीत ठरलेले आहे की मुंबईत कुणाला बसवायचे. भाजपच नाही तर गौतम अदानीही ठरवणार आहे की मुंबईत कुणाला बसवायचे. परंतु ज्या प्रकारचे आकडे मुंबईकरांना दिलेले आहेत ते पाहता कुणालाही सहजतेने महापौर बसवणे सोपे नाही. भाजप कितीही मोठा विजयोत्सव करत असला तरी त्यांचा विजय झालेला नाही, असे संजय राऊत म्हणाले.
नरेंद्र मोदी यांनीही स्वत:च्या भाषणानंतर आत्मचिंतन केले पाहिजे. मोदी असे म्हणताहेत की, ज्या मुंबईत काँग्रेसचा जन्म झाला, तिथे आम्ही त्यांचा पराभव केला. मोदी यांना राजकीय इतिहासाचे भान नाही. गेले किमान 25 वर्ष मुंबईवर शिवसेनेचेच राज्य आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच राज्य आहे. काँग्रेस महाराष्ट्रात असली तरी मुंबईत शिवसेना होती. त्यामुळे मोदींचे भाषण लिहून देणाऱ्यांच्या इतिहासाचे ज्ञान कच्चे आहे, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
शिवसेना विरोधात बसणार का? असे विचारले असता राऊत म्हणाले की, आम्ही अजून काहीच ठरवलेले नाही. आता आम्ही फक्त मजा बघतोय. शिंदे गटाचे नगरसेवक पंचतारांकित हॉटेलमध्ये आहेत. आता भाजपच्या नगरसेवकांनाही कुठेतरी हलवण्यात येत असल्याची माहिती मला मिळतेय. म्हणजे कोण, कुणाला घाबरतंय? असा सवालही राऊत यांनी केला.
खरी शिवसेना उद्धव ठाकरे यांचीच, कपिल सिब्बल यांची खणखणीत प्रतिक्रिया
मुख्यमंत्री दावोसला बसून मुंबईतील नगरसेवकांकडे लक्ष देत आहेत. तिकडे त्यांचे पंतप्रधानांसारखे स्वागत करण्यात आले. एक मराठी माणूस म्हणून फडणवीस यांची देशाच्या पंतप्रधानपदाकडे पावले पडत असतील तर मराठी माणूस म्हणून आम्हाला अभिमान आहे. त्यांनी दिल्लीत जावे आणि देशाच्या पंतप्रधानपदावर दावा ठोकावा. महानगरपालिका, नगरपालिका जिंकल्यानंतर फडणवीस यांचे स्वित्झर्लंडला प्रचंड स्वागत झाले. असे स्वागत पंतप्रधानांचे होते, मुख्यमंत्र्यांचे नाही. पण ही नवीन प्रथा सुरू झाली असून त्यामुळे आमच्या आशा पल्लवीत झाल्या आहे. बहुतेक देशाला एक मराठी पंतप्रधान मिळतोय, असेही राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदे भाजपचे लोहपुरुष असून शिवसेना फोडल्यामुळे अमित शहा त्यांना दिल्लीत खांद्यावर घेऊन फिरतात. कुणीतरी त्यांना दिल्लीतून चावी देत आहे. जर तसे नसते तर 29 नगरसेवकांच्या जोरावर त्यांनी महापौर पदावर दावा सांगितला असता का? भाजप किंवा फडणवीस यांचा महापौर होऊ नये म्हणून दिल्लीतून शिंदेंना चावी देणारा कोण? असा सवालही राऊत यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना केला.

























































