तामिळनाडूमध्ये पोंगल उत्सवाला गालबोट; बैलगाडा शर्यतीदरम्यान बैल बिथरले, एकाचा मृत्यू; 27 जण जखमी

१४ जानेवारी- (सूर्य पोंगल) या दिवशी तांदूळ, गूळ, दुध, खीरचा नैवेद्य दाखवतात.

तामिळनाडूच्या वेल्लोर जिल्ह्यातील गोविंद रेड्डीपलायम गावात पोंगल उत्सवाला गालबोट लावणारी घटना समोर आली आहे. उत्सवादरम्यान बैलगाडा शर्यतीटे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीदरम्यान बैल बिथरले आणि गर्दीत घुसले. यावेळी एकच गोंधळ उडाला. दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला तर 27 जण जखमी झाले.

पोंगल उत्सवादरम्यान रविवारी ‘एरुथुविट्टल विझा’ या पारंपरिक बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीत 100 हून अधिक बैलांचा सहभाग होता. शर्यत पाहण्यासाठी 5 हजाराहून अधिक नागरिक जमले होते.

शर्यतीदरम्यान बैल बिथरले आणि प्रेक्षकांच्या गर्दीत सैरावैरा पळू लागले. यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ माजला. बैलाने धडक दिल्याने एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला तर अन्य 27 जण जखमी झाले. थिलागर (65) असे मयत व्यक्तीचे नाव असून ते आपल्या मुलीला भेटायला गोविंद रेड्डीपलायम येथे आले होते. शर्यत पाहण्यासाठी अंतिम रेषेजवळ उभे असताना एका बैलाने त्यांना धडक दिली. या धडकेमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी आर्यूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.