त्याने अश्लील कृत्य केले अन् माझे…., दिल्लीत अमेरिकन मुलीचा विनयभंग

हिंदुस्थानात विदेशी लोकांना फसवणाच्या किंवा त्यांच्यासोबत गैरवर्तन करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अशीच एक घटना अमेरिकेची रहिवाशी असणाऱ्या एका तरूणीसोबत घडली. अमेरिकेतील ‘स्टीव्हन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’मध्ये कार्यरत असलेले हिंदुस्थानी वंशाचे प्रोफेसर गौरव सबनीस यांनी हिंदुस्थानानतील गैरप्रकाराची तरूणीला  आधीच कल्पना दिली होती. मात्र दुर्दैवाने गौरव सबनीस यांनी व्यक्त केलेली भीती अखेर खरी ठरली आहे.

नोव्हेंबरमध्ये जेव्हा त्यांची एक अमेरिकन विद्यार्थिनी हिंदुस्थान दौऱ्यावर येणार होती, तेव्हा त्यांनी तिला हिंदुस्थानातील गर्दीच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक शोषणाबाबत आणि विशेषतः दिल्लीतील असुरक्षिततेबाबत सावध केले होते. मात्र त्यांची भीती खरी ठरली आणि दिल्ली प्रवासादरम्यान या तरुणीला एका अत्यंत धक्कादायक अनुभवाला सामोरे जावे लागले.

दरम्यान य़ा विदेशी तरूणीला हिंदुस्थानात आलेल्या अनुभवाबाबत तिने सबनीस यांना सांगितले. यावर सबनीस यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, जेव्हा अमेरिकन तरूणी हिंदुस्थानात पोहोचली तेव्हा तिला पाहून अनेकांना आश्चर्य वाटले होते. ती अमेरिकन असल्यामुळे सगळे जण तिच्यासोबत सेल्फी काढत होते. सुरुवातीला तिला या गोष्टी नॉर्मल वाटल्या होत्या. मात्र दिल्ली मेट्रोतील एका घटनेने तिला हादरवून सोडले.

दिल्ली मेट्रोमध्ये प्रवास करत असताना एका 15 वर्षांच्या मुलाने त्याच्या आई आणि बहिणीसमोर या तरुणीसोबत फोटो काढण्याची विनंती केली. मुलगा त्याच्या कुटुंबासोबत असल्याने तरुणीने संमती दिली. मात्र, फोटो काढताना त्या मुलाने प्रथम तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्यानंतर थेट तिच्या शरीराला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत विनयभंग केला. धक्कादायक बाब म्हणजे, हे कृत्य केल्यानंतर तो मुलगा जणू काही विनोद केला असावा अशा भावनेत हसू लागला, ज्यामुळे पीडित तरुणी प्रचंड संतापली. या घटनेनंतर तरुणीने जेव्हा त्या मुलाची कॉलर पकडून जाब विचारला, तेव्हा मुलाच्या आई आणि बहिणीने मुलाला फटकारण्याऐवजी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. “त्याने याआधी कधी गोरी मुलगी पाहिली नाही, म्हणून तो उत्साहात आला असावा,” असे धक्कादायक समर्थन त्याच्या घरच्या महिलांनी केले. कुटुंबाकडून मिळालेली ही वागणूक त्या अमेरिकन तरुणीसाठी अधिक वेदनादायी होती.

या भीषण अनुभवानंतर पीडित तरुणीने गौरव सबनीस यांना मेसेज करून सांगितले की, या एका घटनेमुळे तिचा संपूर्ण हिंदुस्थान फिरण्याचा अनुभव फार वाईट होता. ची म्हणाली जरी तिला हिंदुस्थानचा काही भाग आवडला असला, तरी आता ती पुन्हा कधीही तेथे पाऊल ठेवणार नाही. केवळ हिंदुस्थानच नाही, तर दक्षिण आशियातील कोणत्याही देशात जाण्याची आपली इच्छा संपली असल्याचे तिने नमूद केले आहे.