
हिंदुस्थान आणि न्यूझीलंड संघात नुकतीच तीन सामन्यांची एक दिवसीय मालिका खेळवण्यात आली. यातील निर्णायक सामना इंदूरच्या होळकर क्रिकेट मैदानावर रविवारी पार पडला. या लढतीत 41 धावांनी विजय मिळवत न्यूझीलंडने पहिल्यांदाच हिंदुस्थानमध्ये वन डे मालिका जिंकण्याचा कारनामा केला. या लढतीत किंग विराट कोहली याने शतकी खेळी केली. त्याने हर्षित राणासोबत किल्ला लढवला, मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. एकीकडे विराट कोहली चांगला फॉरमात दिसत असून दुसरीकडे रोहित शर्माच्या अपयशाची मालिका मात्र सुरूच आहे.
न्यूझीलंडविरुद्ध सलग तिसऱ्या सामन्यात रोहित शर्माला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. रविवारी झालेल्या लढतीत न्यूझीलंडने हिंदुस्थानपुढे विजयासाठी 338 धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा यशस्वी पाठलाग करण्यासाठी हिंदुस्थानला दमदार सलामीची गरज होती. मात्र रोहित शर्मा पहिल्या दोन्ही लढतींप्रमाणे चांगला स्टार्ट मिळूनही मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. 11 चेंडूत अवघ्या 13 धावा काढून तो बाद झाला.
धावांचा पाठलाग करताना चौथ्या षटकातील चौथ्या चेंडूवर न्यूझीलंडचा यष्टीरक्षक मिचेल जेम्स हे याने रोहितचा सोपा झेल सोडला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर रोहितने शानदार चौकार ठोकला. यामुळे मिळालेल्या जीवदानाचा रोहित फायदा उठवेल असे वाटत होते. पण त्यापुढील चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला. याआधी झालेल्या दोन्ही लढतीतही त्याची बॅट विशेष तळपली नव्हती. पहिल्या सामन्यात तो 26, तर दुसर्या सामन्यात 24 धावांवर बाद झाला होता. तिन्ही लढतीत मिळून त्याला फक्त 61 धावा करता आल्या.
दुसरीकडे विराट कोहली याने मात्र आपला फॉर्म कायम राखत तीन सामन्यांच्या मालिकेत धावांचा पाऊस पाडला. इंदूरमधील लढतीतही त्याने एकाकी झुंज दिली. हिंदुस्थानसमोर धावांचा डोंगर असताना आणि समोरून एक-एक फलंदाज बाद होतानाही त्याने मैदानावर शड्डू ठोकत शतकाला गवसणी घातली. बाद होण्यापूर्वी विराटने 108 चेंडूत 124 धावा चोपल्या. या खेळी दरम्यान त्याने 10 चौकार आणि 3 उत्तुंग षटकार ठोकले. वडेदरा येथे झालेल्या पहिल्या लढतीत विराटने 93 धावा केल्या होत्या तर, राजकोटला झालेल्या दुसऱ्या लढतीत 23 धावांची खेळी केली होती.
दरम्यान, विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघांनीही कसोटी आणि टी-20 मालिकेतून निवृत्ती घेतलेली आहे. दोघेही फक्त वन डे क्रिकेटमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करत आहेत. यंदाच्या वर्षी हिंदुस्थान हातांच्या बोटावर मोजता येतील एवढेच वन डे सामने खेळणार आहे. त्यामुळे दोघांनाही 2027 चा वर्ल्डकप खेळायला असेल तर चांगली कामगिरी करावी लागेल. विराट कोहली उत्तम फॉरमात असला तरी रोहित शर्माला आगामी काळात बॅटची जादू दाखवावीच लागणार आहे.

























































