
महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान दोन राजकीय गटांमध्ये झालेल्या राडा प्रकरणात फरार झालेल्या विकास गोगावले आणि महेश गोगावले या दोघांना अटक करण्यास टाळाटाळ केल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सरकारची खरडपट्टी काढली. राडय़ा प्रकरणी कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास आणि पुतण्या महेश याला पाठीशी का घालताय? त्यांना अद्याप अटक का केली नाही असा सवाल करत न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या एकलपीठाने रायगड पोलिसांना धारेवर धरले. इतकेच नव्हे तर बुधवार 21 जानेवारी पर्यंत याप्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.
महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान शिंदे गट आणि अजित पवार गटात मारामारी झाली. या राडा प्रकरणात माजी आमदार माणिक जगताप यांचे पुत्र आणि अजित पवार गटाचे नेते श्रीयांश जगताप यांच्यासह पॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास आणि पुतण्या महेश व अन्य काही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी श्रीयांश जगताप तसेच महेश गोगावले यांनी अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात अर्ज दाखल केला. या अर्जावर न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या एकल पीठासमोर सुनावणी घेण्यात आली. सत्ताधारी मंत्र्यांचे पुत्र आणि नातेवाईक महिनाभर फरार असूनही पोलीस त्यांना पकडू शकलेले नाहीत, यावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विकास गोगावले आणि महेश गोगावले यांचा अटकपूर्व जामीन 23 डिसेंबर 2025 रोजीच फेटाळला गेला होता. तरीही आजपर्यंत पोलीस त्यांना अटक करू शकलेले नाहीत, हे आश्चर्यकारक आणि गंभीर असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्यावर सरकारच्या वतीने महाधिवक्ता मिलिंद साठे यांनी सांगितले की, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत त्यावर न्यायालयाने याप्रकरणी सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देत सुनावणी 22 जानेवारीपर्यंत तहकूब केली.
g पोलीस रेकॉर्डनुसार महेश गोगावले फरार आहे. मात्र त्याच महेश गोगावलेने 14 जानेवारी 2026 रोजी नवी मुंबईतील एका नोटरीसमोर हजर राहून प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी केली आहे. जर आरोपी नोटरीसमोर हजर होऊ शकतो, तर पोलिसांना तो का सापडत नाही, असा सवाल न्यायालयाने केला.






























































