पाच हजार प्रवाशांचा द्राविडी प्राणायाम संपणार; गव्हाणफाटा-चिरनेर मार्गावरील रेल्वे ओव्हरहेड ब्रीज दोन महिन्यांत खुला होणार

गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या गव्हाणफाटा-चिरनेर मार्गावरील रेल्वे ओव्हरहेड ब्रीजचे काम अखेरच्या टप्प्यात आले आहे. आता पुलावर गर्डर टाकण्यात आले असून वेल्डिंगचे काम सुरू आहे. पुलाचे काम युद्धपातळीवर करून हा पूल दोन महिन्यांत खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे पाच हजार प्रवाशांचा द्राविडी आणायाम कायमचा संपणार आहे.

जेएनपीए बंदरातून देशभरात कंटेनर मालाची वाहतूक करणाऱ्या रेल्वे मार्गावरील धोकादायक गव्हाण ते चिरनेरला जोडणारा पूल तीन वर्षांपूर्वी पाडण्यात आला. या पुलाच्या जागी नवीन पुलाचे काम कासवगतीने सुरू आहे. जुन्या पुलावरून पनवेल, मुंबई, नवी मुंबई व ठाण्यासह इतर मार्गाकडे जाणारा व उरण पूर्वेला जोडणारा गव्हाणफाटा-चिरनेर रस्त्यावरून दररोज पाच हजारांहून अधिक वाहने जात होती. मात्र मध्य रेल्वेच्या कंटेनर माल पची वाहतूक करणारा ओव्हरहेड ब्रीज पाडण्यात आल्यानंतर वाहनचालकांची एव प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.

दीड किलोमीटरचा फेरा
पर्यायी रस्त्याने वाहनचालकांना गव्हाणफाटावरून सुमारे दीड किलोमीटरचा फेरा घालून चिर्लेमार्गावरून प्रवास करावा लागत आहे, तर चिरनेर मार्गावरून येणाऱ्या वाहनांना पनवेलकडून येणाऱ्या महामार्गाच्या उलट्या धोकादायक मार्गातून वळसा घेऊन गव्हाणफाटा मार्ग गाठावा लागत आहे. रेल्वे पूल बंद करण्यात आल्याने तालुक्यातील जांभूळपाडा, वेश्वी, दिघोडे या गावाची एसटी सेवा बंद झाली. मात्र आता रेल्वे पुलाच्या कामाने गती घेतल्याने हा पूल लवकरच खुला होणार आहे. त्यामुळे हजारो वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे.

काही तांत्रिक अडचणीमुळे या पुलाच्या कामाला विलंब झाला असला तरी मागील तीन वर्षांपासून रखडलेल्या मालवाहू रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड पुलाचे काम जोमाने सुरू आहे. पुलाच्या कामाला वेग आला आहे. यामुळे येत्या मार्च २०२६ अखेरपर्यंत या पुलाचे काम पूर्ण करण्यात येईल.
राघवेंद्र श्रीवास्तव,
सहाय्यक अभियंता, डीएफसीसीआयएल विभाग.