पालिकेच्या CBSE मंडळ शाळांमधील 366 विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा, आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील उपक्रम

BMC CBSE Schools Mumbai

मुंबई महानगरपालिकेने विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी सुरू केलेल्या सीबीएसई मंडळाच्या शाळांमधील पहिली तुकडी यावर्षी दहावीची परीक्षा देणार आहे. पालिकेकडे सध्या सीबीएसई बोर्ड असलेल्या 18 शाळांमधील 366 विद्यार्थ्यांना परीक्षेत घवघवीत यश मिळावे यासाठी सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या जात आहेत. याशिवाय काही खासगी शाळांच्या तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन घेतले जात आहे. शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून पालिकेच्या शाळांमध्ये सीबीएसईसारख्या केंद्रीय बोर्डांचे शिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त पूर्व उपनगरे डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या पालिकेच्या शिक्षण विभागाकडून मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, गुजराती, तामिळ, तेलुगू, कन्नड या आठ भाषांमध्ये शिक्षण दिलं जातं. तसेच एसएससी, सीबीएसई, आयसीएसई आणि आयबी अशा चार मंडळाचे अभ्यासक्रम शिकविणाऱया शाळा आहेत. गेली अनेक वर्षे माध्यमिक शालान्त परीक्षा मंडळाच्या विद्यार्थ्यांना याचा उत्तम लाभ मिळत आहे आणि निकालाची टक्केवारी सरासरी 93 टक्के इतकी गौरवास्पद राहिली आहे.

विशेष सराव अभ्यास, खासगी शाळांचेही मार्गदर्शन

पालिका शाळांमधील शिक्षक या विद्यार्थ्यांकडून सराव करून घेत आहेत. गणित, विज्ञान, सामाजिक शास्र, इंग्रजी, माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान या विषयांवर अधिक लक्ष देण्यात येत आहे. यासोबतच काही खासगी सीबीएसई शाळांमधील तज्ञ शिक्षकांचीही यासाठी मदत घेण्यात येत आहे. सदर तज्ञ शिक्षकांचे उत्तरपत्रिका लिहिण्याविषयी विशेष मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.