
विक्रोळी वॉर्ड क्रमांक 119 मधून निवडून आलेले शिंदे गटाचे राजेश सोनवळे अपात्र ठरण्याची चिन्हे आहेत. कायद्यानुसार ते निवडणूक लढवण्यास पात्र नसतानाही त्यांना उमेदवारी देण्यात आल्याने याप्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर 28 जानेवारी रोजी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती सुमन शाम यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.
शिंदे गटाकडून राजेश सोनवळे यांना उमेदवारी देण्यात आली होती; मात्र सोनवळे हे ‘शिवशाही बहुउद्देशीय सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था मर्यादित’ या संस्थेचे अध्यक्ष असून, ही संस्था महानगरपालिकेची कंत्राटदार आहे. ते लाभाचे पद भूषवत असून मुंबई महानगरपालिका कायदा कलम 16(एफ) नुसार ते निवडणूक लढवण्यास पात्र नाहीत, असा दावा करत अपक्ष उमेदवार संदीप खरात यांनी हायकोर्टात याप्रकरणी याचिका दाखल केली आहे.
संदीप खरात यांनी आक्षेप नोंदवत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती; मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी तो आक्षेप दप्तरी दाखल करून आक्षेपात तथ्य असल्यास उमेदवार विजयी झाल्यासही बाद होऊ शकतो असे सांगून पुढील कारवाई न करताच निवडणूक प्रक्रिया पूर्ण केल्याचे सांगितले.
नियमानुसार उमेदवाराने अशा संस्थांचा राजीनामा देऊन त्यासंदर्भातील कागदपत्रे नामनिर्देशक अर्जासोबत जोडणे बंधनकारक असते; मात्र सोनवळे यांनी महत्त्वाची माहिती लपवून पालिका तसेच निवडणूक आयोगाची दिशाभूल केल्याचा आरोप खरात यांनी केला आहे.






























































