
अंधेरीच्या स्वामी समर्थ नगरातील नालंदा इमारतीच्या दोन घरांवर झालेला गोळीबार नेमका केला कोणी, कुठून केला आणि कसा केला याचे कोडे आज तिसऱ्या दिवशीदेखील सुटले नाही. काहीच समजून येत नसल्याने पोलीस अक्षरशः चक्रावून गेले आहेत.
रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास नालंदा इमारतीच्या दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरील रूमबाहेर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. भरदुपारी ही घटना घडल्याने लोखंडवाला परिसरात खळबळ उडाली. सुरुवातीला नेमके काय घडले हेच समजून येत नव्हते. पण पिस्टलमधून झाडलेल्या गोळ्यांच्या पुंगळ्या मिळाल्यानंतर प्रकरण गंभीर असल्याचे समोर येताच इमारतीमधील नागरिकांनी तत्काळ पोलिसांना याबाबत कळवले. त्यानंतर ओशिवरा पोलीस तसेच गुन्हे शाखेची पथके घटनास्थळी दाखल झाली. पण हा गोळीबार झाला कसा हेच समजून येत नसल्याने तपास पथके चक्रावून गेली आहेत. त्यामुळे गोळीबार कोणी केला, का केला हे कोडे अजून तरी गुलदस्त्यात आहे. आज तिसऱ्या दिवशीदेखील पोलिसांना काहीच समजून येत नसल्याचे चित्र होते.
पश्चिम प्रादेशिक विभागात येणाऱ्या पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी तसेच गुन्हे शाखेची चार ते पाच पथके गुह्याचा तपास करीत आहेत. पण गोळीबार झाला कसा हेच समजत नसल्याने सर्वच गोंधळलेल्या अवस्थेत आहेत.
समोर मोठे पत्रे, मग गोळ्या झाडल्या कुठून?
नालंदा इमारतीच्या समोर बांधकामाची साईट सुरू आहे. त्यामुळे इमारतीच्या समोरच्या फुटपाथवर मोठमोठे पत्रे लावण्यात आले आहेत. नालंदा इमारत चार मजली असल्याने समोरून कसे कोणी गोळ्या झाडू शकतो, हा प्रश्न पोलिसांना पडला आहे. रहस्यमयरीत्या हा गोळीबार असल्याने तपास करताना पोलीस चक्रावून गेले आहेत.






























































