
लाडकी बहीण योजनेतील अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यावर पैसे जमा न झाल्याने लाभार्थी महिलांमध्ये चिंता व्यक्त होत असताना महिला व बालविकास विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ई-केवायसी चुकली तर नाही ना, असा प्रश्न त्यांना पडला आहे. मात्र ई-केवायसी चुकली तरी घाबरून जाऊ नका, असे आवाहन सरकारने केले आहे. लाडक्या बहिणींची आता प्रत्यक्ष पडताळणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबांतील महिलांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दरमहा दीड हजार रुपये दिले जातात. निकषांची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी वेळोवेळी मुदतवाढही देण्यात आली होती. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी यासंदर्भात महत्त्वाची सूचना ट्विट करत दिली आहे.





























































