
मुंबई सेंट्रल, ताडदेव-नागपाड्याला जोडणाऱ्या बेलासिस पुलाचे काम विक्रमी वेळेत म्हणजे अवघे 15 महिने आणि सहा दिवसांत पूर्ण झाले आहे. या उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्यासाठीचा निर्धारित कार्यकाळ अजून चार महिने शिल्लक आहे. दरम्यान, हा पूल 26 जानेवारीपासून वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. या पुलामुळे मुंबई सेंट्रल, ग्रँट रोड परिसरातील वाहतूककोंडीपासून सुटका होणार आहे.
दक्षिण मुंबईतील जहांगीर बोमन बेहराम मार्गावरील (पूर्वीचे बेलासिस रोड) बेलासिस पूल हा मुंबई सेंट्रल, नागपाडा आणि ताडदेव या भागांना लोहमार्गावरून पूर्व-पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. बेलासिस पुलाच्या पुनर्बांधणीमुळे दोन वर्षांपासून बाधित झालेली पूर्व-पश्चिम वाहतुकीसाठीची सुविधा पुन्हा सुरू होणार असल्याने प्रवासी वाहतूकदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
असे होते आव्हान
बेलासिस पुलाचे काम पूर्ण करणे हे पालिकेसमोर मोठे आव्हान होते. यामध्ये ‘बेस्ट’ वाहिन्यांचे स्थलांतरण, पूल बांधकामास अडथळा ठरणारी 13 बांधकामे हटवून पर्यायी घरांचे वाटप करणे, पुलानजीकच्या एका गृहनिर्माण संस्थेची बाधित होणारी सीमाभिंत हटविणे आणि उच्च न्यायालयासमोरील खटला आदींचा समावेश होता.



























































